हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा घणाघात
मुंबई:– अच्छे दिन आणणार असे आश्वासन देऊन हे सरकार केंद्रात व राज्यात सरकारवर आले. पण गेल्या चार वर्षात या लोकांचा खोटेपणा उघड झाला आहे. या नतद्रष्ट सत्ताधाऱ्यांना सत्तेतून घालविल्याशिवाय थांबवायचा नाही असे सांगत या लोकांना फसविणाऱ्या सरकारला खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आझाद मैदानावर हल्लाबोल मोर्चाच्या सभेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार घणाघात केला. बुधवारी दुपारी मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार माजीद मेमन, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी खासदार संजय दिना पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, किरण पावसकर, विद्या चव्हाण, जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ पक्षाचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, चार वर्षात या लोकांचा खोटेपणा उघड झाला आहे. आता लोक आम्हाला असाच दिन वगैरे काही नको असे म्हणू लागले आहेत. आधीचे दिन परत आणा असे लोक म्हणत असल्याचे पवार म्हणाले. या सरकारच्या काळात इंधनापासून गॅस आणि अनेक जीवनावश्यक प्रचंड महाग झाल्या आहेत. रोजगाराची साधने कमी झाली आहेत. सोबतच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक घटकांवरील अन्याय मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे पवार यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला असून राज्यामध्ये गुन्हेगारीचे असल्याचे पवार म्हणाले. शिवस्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची आधी केवळ जाहिरात बाजी झाली मात्र अजूनही प्रत्यक्षात कामे सुरु झालेली नाहीत. लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि नंतर फसवणूक करायची हे या लोकांचे धोरण असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
लढाई परिवर्तनशिवाय थांबवायची नाही- तटकरे
या सरकारने सांगितले होती की प्रत्येक वर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देऊ मात्र अद्यापही तरुणांना रोजगार मिळाला नाही. या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल. आता ही लढाई परिवर्तनशिवाय थांबवायची नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. इथल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही विधिमंडळात अनेक वेळा बोललो आहोत. मात्र त्याबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचे काम भाजप आणि शिवसेनेने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदैव मुंबईचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने बनवले त्यासाठी प्रफुल्लभाईंचे विशेष अभिनंदन तटकरे यांनी केले.
चुकीच्या धोरणामुळे महागाई – जयंत पाटील
आज प्रचंड महागाई वाढली आहे, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही महागाई वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली असे माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले. या सरकारने सुरू केलेला एक प्रकल्प पूर्ण होणार नाही. नवी मुंबईतील विमानतळ १९ पर्यंत पूर्ण होईल मात्र कंत्राटदाराला २०२१ पर्यंतची मुदत दिली. मुख्यमंत्री राज्यातील जनतेची का फसवणूक करत आहेत ? लोकांना आपण काय सांगतोय याचे भान या सरकारला राहिले नाही, असे पाटील म्हणाले.
मुंबईत भ्रष्टाचाराचा मोठा वटवृक्ष – मुंडे
मुंबईत झाडापासून कचऱ्यापर्यंत भ्रष्टाचाराचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. या वटवृक्षाची छाया जर कुठे जात असेल तर ती वांद्र्यापर्यंत जात आहे. दिल्लीतील चौकीदाराच्या साक्षीने मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे. मुंबईचे एक विशेष महत्त्व होते मात्र हे महत्त्व नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या राज्यात टिकून राहणार की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे इथले सगळे व्यवसाय गुजरात आणि तिथल्या शहरात जात आहे. ज्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लागेल तेव्हा आपल्याला या भाजपवाल्यांना घरी पाठवावे लागेल असे मुंडे म्हणाले.
मुंबईतला व्यापार मोडकळीस आला – प्रफुल्ल पटेल
आज मुंबई प्रचंड हाल सहन करत आहे. मुंबईतला व्यापार मोडकळीस आला आहे. इतर शहरांनी मुंबईला मागे टाकले आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्बस्फोट झाला होता तेव्हा २४ तासाच्या आत पवार साहेबांनी मुंबई सुरळीत केली होती. सरकारमधील लोक मुंबईतील लोकांना साधणे पुरवण्यास अपयशी ठरत आहे. आता देशात आणि राज्यात परिवर्तनाची गरज आहे. येत्या निवडणुकांमध्ये पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे पटेल म्हणाले.
छेडछाडीचा घटनांमध्ये वाढ – चित्रा वाघ
राज्यात २० टक्क्यांनी छेडछाडीचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले. सरकारमधील लोक म्हणतात की तुमच्या कार्यकाळात होत नव्हते का बलात्कार? आबांनी बलात्काराच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. गरीबांची मुले बरबाद होऊ नये म्हणून डांसबार बंद केला. हे सरकार क्राईम रेट कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही, असे त्या म्हणाल्या. एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांचा बळी गेला. सरकार, मनपा असे प्रकार रोखण्यासाठी काहीच करत नाही सरकारने मोठ्या थाटामाटात शिवस्मारकाचे जलपूजन केले मात्र अजूनही त्याचे काम सुरू झाले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर, जिजामाता, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे आणि इतर महापुरुषांच्या स्मारकाचीही तीच परिस्थितीअसल्याचे वाघ म्हणाल्या.
मुंबईत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी – मलिक
मुंबईत ४०-५० टक्के लोक झोपडपट्टी राहतात त्यांना गरिबांना संरक्षण देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने केले असल्याचे नवाब मलिक यावेळी म्हणाले. हे आता म्हणतात २०२२ पर्यंत सर्वांना घरे देऊ पण तुमची मुदत २०१९ पर्यंतच मग लोकांची ही फसवणूक कशाला ? मुंबईत मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई पोर्टमधील लोकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. आता असं म्हणतात ती मुंबईतला पोर्टही बंद होणार आहे. हे सरकार जे नवं कामगार धोरण बनवत आहे त्यामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब होत आहे. इथे शेतकरी मरत आहे आणि मुख्यमंत्री आपल्या धर्मपत्नीसह गाणे गात आहेत. एका एनजीओचा तो व्हिडीओ आहे असं म्हटलं जातं मग कमिशनर त्या व्हिडीओ काय करत होते ? असा सवाल त्यांनी केला.