मुक्ताईनगर । अंतुर्ली येथील एकवीरा ज्वेलर्सचे मालक नंदकिशोर श्यामकांंत सोनार यास 18 ठेवीदाराची 59 लाख 45 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपीने जामिनासाठी अर्ज केला तो अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. नंदकिशोर सोनार याने त्याआधी तीन वेळा जिल्हा न्यायालयातून व एक वेळा औरंगाबाद खंंडपीठातून अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी त्यास अटक केली होेती. मुक्ताईनगर न्यायालयाने त्यास सुरुवातीस 10 दिवसांची पोलीस कोठडी व नंतर चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याविरुध्द आरोपी सोनार याने भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा दिवाणी व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्या. एस.के. कुळकर्णी यांनी तो फेटाळून लावला. सरकारतर्फे अॅड. विजय खडसे, आरोपीतर्फे सागर चित्रे व फिर्यादीतर्फे अॅड. तुषार पटेल व अॅड. किशोर पाटील यांनी काम पाहिले. सोनार यांचा सतत दुसर्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.