जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षकांसोबत तरुणींचा वाद ; सायबर पोलीस कर्मचार्यांकडून अर्थपूर्ण व्यवहार? ; पोलीस निरिक्षकांकडून कर्मचार्यांची झाडाझडती
जळगाव- बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगत गंडविणार्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. दिल्लीच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून ते चौघेही जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कोठडीत आहेत. सायबर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांनी अर्थपूर्ण व्यवहारातून कोठडीतील संशयितांना मनाप्रमाणे जेवण तसेच व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हापेठ पोलीस उपनिरिक्षक यांच्या प्रकार लक्षात आल्यावर संशयितांना जेवण तसेच शितपेय देणार्या तरुणींना हटकल्यावर त्यांनी वाद घातल्यावर प्रकार उघड झाला. दरम्यान सायबर पोलीस निरिक्षकांनी संबंधित दोघा कर्मचार्यांवर चांगलीच झाडाझडती घेतल्याचेही सूत्रांकडून समजते.
चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत डॉ. अजय ओंकारनाथ दहाड यांना एटीएमकार्डचे पैसे करत असल्याचा बहाणा करुन भामट्याने 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दिल्ली येथील कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. तसेच मास्टरमाईंड भुपेंदर सिंग कुमार मुकेश कुमार (वय 20 रा, ईश्वर कॉलनी सह अर्जून पार्क, नजबगढ, नवी दिल्ली), अमन लांबा बालकिशन लांबा (वय 21, उत्तमनगनर, नवी दिल्ली), राहूल कौशिक सुरेश कुमार (वय 21 उत्तमनगर नवी दिल्ली, व नितीन राकेश टंडन (वय 24 रा. उत्तम नगर नवी दिल्ली) या चौघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मैत्रिणींकडून संशयितांची ‘बडदास्त’
चार संशयित जिल्हापेठच्या कोठडीत आहेत. या संशयित अटक झाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्यासोबतच्या मैत्रिणी जळगावात दाखल झाल्या. संशयितांच्या खुशामतीसाठी जळगावात एका ठिकाणी त्या वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी काही तरुणी संशयितांसाठी जेवण तसेच शितपेये घेवून पोलीस ठाण्यात आल्या. यादरम्यान हा प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संदीप आराक यांच्या लक्षात आला. त्यांनी तरुणींना फक्त भेटण्याची परवानगी असून बाहेरुन जेवण अथवा कुठलेही शितपेये देता येणार नाही, असे हटकले. यानंतर संबंधित तरुणींनी आराक यांच्यासोबत वाद घातला.
आरोपींसोबत अर्थपूर्ण व्यवहारातूनच बडदास्त?
संशयितांच्या बडदास्तसाठी सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचार्यांनी अर्थपूर्ण व्यवहार केला. त्यातून हा प्रकार घडल्याचे कळते. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यावर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले होते. याप्रकरणी निकम यांनी संबंधित कर्मचार्यांची झाडाझडती घेतल्याचीही माहिती मिळाली आहे. यानंतर सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांमध्ये असलेल्या दोन गटात मोठा वादही उफाळून आल्याचे कळते. दरम्यान यात कर्मचार्याच्या एका गटाने आरोपींकडून दोन लाख घेतल्याने वादाला तोंड फुटल्याचेही सूत्रांकडून समजते.
प्रतिक्रिया
काही तरुणी जेवण तसेच शीतपेय देण्यासाठी संशयितांना आल्या होत्या. मी त्यांना फक्त भेटता येईल. शीतपेय देता येणार नाही, असे सांगितल्यावर त्यांनी वाद घातला. कोणता कर्मचारी गार्ड म्हणून होता ते सांगता येणार नाही.- संदीप आराक, पोलीस उपनिरिक्षक
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कोठडीत असलेल्या संशयितांना बाहेरुण जेवण तसेच शितपेय दिले जात असल्याचा प्रकार माहिती पडताच जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी माहिती जाणून घेतली. युपढे असा प्रकार घडू नये याबाबत तरुणींना तसेच कार्यरत गार्डला खडसावले. यानंतर तरुणी पुन्हा आल्या नाहीत. याप्रकरणात सायबर पोलीस ठाण्याच्या कुठल्याही कर्मचार्यानेही पैसे घेतल्याचा गैरप्रकार केलेला नाही.- अरुण निकम, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे