फसवणुप्रकरणी सिनेअभिनेत्याच्या पतीला न्यायालयीन कोठडी

0

मुंबई- कलर्स चॅनेलच्या कलश या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची तसेच दाक्षिणात्य चित्रपटात चांगली भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 44 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला सिनेअभिनेत्री कृतिका चौधरीचा पती विजय जगतनारायण द्विवेदी याची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात आले आहे.

फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्याला आंबोली पोलिसांनी अटक केली होती. दोन वर्षांपूर्वी ओळख झालेल्या एका मॉडेलला विजय द्विवेदीने कलर्सच्या एका मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका तर दाक्षिणात्य चित्रपटात चांगली भूमिका देण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी त्याने तिच्यासह अन्य काही तरुणींकडून सुमारे 44 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी विजयविरुद्ध आंबोली पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याला 30 जूनला आंबोली पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत होता. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला काल दुपारी पुन्हा अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात आले होते. विजय द्विवेदी अशा प्रकारे फसवणुक करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने जनार्दन द्विवेदी या कॉग्रेस नेत्याचा मुलगा तसेच इतर राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची बतावणी करुन अनेकांची फसवणुक केली आहे. मुंबईसह दिल्लीत त्याने अशा प्रकारे फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने एका चित्रपट निर्मात्याला चित्रपटासाठी तीन कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून अनुदानासाठी 55 लाख रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतर तो पळून गेला होता.