जळगाव । महानगर पालिकेने जिल्हा प्रशासनाची फसवणूक करून शासकीय जागांवर घरकुल बांधल्याने महापालिकेच्या आजी माजी पदाधिकारी व अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता उल्हास साबळे यांनी पत्रकार परिषदेत केली. हरीविठ्ठल, खंडेराव नगर, तांबापुरा तसेच समता नगर मधील जागा शासकीय मालकीच्या असतांना महापालिकेने यावर कोट्यांवधी रूपयांची घरकुले बांधली असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.
ठेकेदाराला बिनव्याजी अॅडव्हॉन्स
या जागांवर शेकडो रूपयांचे कर्ज घेवून या जागांवर घरकुल बांधणार्या खान्देश बिल्डरला तांबापूरा येथील घरकुल योजना, समतानगर येथील घरकुल योजना, हरीविठ्ठल घरकुल योजना तसेच खंडेराव नगर येथील घरकुल योजनेसाठी मोबीलायझेशन अॅडव्हान्स दिला असल्याचे साबळे यांनी सांगितले. ही सर्व जागा शासकीय असतांना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे साबळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच त्या शासकीय जागांवर करोडो रूपयांचे कर्ज घेवून ठेकेदारांना मात्र करोडो रूपयांचा बिनव्याजी मोबीलायझेशन अॅडव्हान्स देवून ते व्याज मनपाने भरावे असा बेकायदेशीर ठराव करण्यात आला असल्याचे साबळे यांनी सांगितले.
चौकशी न केल्याचा आरोप
तत्कालीन जिल्हाधिकार्यांपासून आजपर्यंतच्या जिल्हाधिकार्यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले. याबाबत साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 2016 साली तक्रार केली असता उपविभागयी अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, दोन वर्षांनंतरही या कार्यालयाने कोणतीही चौकशी केली नसल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.