फसवणूक करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा

0
सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
निगडी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या निगडी येथील जलकुंभाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे झाली आहे. त्या पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे निगडी विभागात राहणार्‍या नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात जलकुंभावर सुरक्षा रक्षक नसतात. तरीही सुरक्षा रक्षकांच्या नावाखाली लाखो रूपयांचा निधी लाटण्याचा प्रकार संबंधित नॅशनल सिक्युरीटी संस्थेकडून होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत खैरनार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे की, राहूल नगर येथे असणार्‍या जलकुंभावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत व रुपीनगर या सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असलेल्या विभागाला पाणीपुरवठा केला जातो. परंतू जलकुंभाच्या या प्रतिबंधीत क्षेत्रात कुणीही सहजतेने प्रवेश करू शकतो. ज्या व्यक्तिंचा महापालिकेशी, जलकुंभाच्या व्यवस्थापनाशी कसलाही संबंध नाही, अशा व्यक्ती जलकुंभाच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या दिसून येतात. जलकुंभावर पत्त्यांचे डाव, दारूच्या पार्ट्या रंगलेल्या असतात. त्यामुळे तेथे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात कित्येक वेळा तक्रार करून देखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. महापालिका यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे बिनदिक्कतपणे चुकीच्या कामांना प्रोत्साहन मिळते. पाण्याची टाकी बांधल्यापासून ते आजतागायत तेथे एकही सुरक्षा रक्षक कामास नाही परंतू आत्ता पर्यंत सुरक्षा रक्षकांच्या नावाखाली संबंधित कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रकार केलेला आहे. त्यामुळे या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच त्यांनी आत्तापर्यंत केलेला लाखो रूपयांचा अपहार वसूल करण्यासाठी कारवाई करण्यात यावी.