फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरचा पर्दाफाश

0

नागपूर : महाराष्ट्रासह विविध राज्यातील बेरोजगारांना सरकारी नोकरीचे बनावट कॉल लेटर पाठवून त्यांची फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत हजारो बेरोजगारांना फसविणार्‍या चंद्रपूर येथील बनावट कॉल सेंटरचाही सायबर क्राईमने भंडाफोड केला. याप्रकरणी प्रवीणकुमार वाल्मिकी प्रसाद ( वय 44, बिहार शरिफ-बिहार) आणि अरुण विनोद त्रिवेदी (वय 32 रायबरेली-उत्तरप्रदेश) यांना अटक केली असून त्यांच्याकडून सही, शिक्के असलेले शेकडो बनावट नियुक्तीपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अशी केली जात होती फसवणूक
आरोपींनी काही पैसे गोळा करून चंद्रपुरात बनावट कॉल सेंटर उघडले होते. त्यासाठी 3 कॉम्प्युटर, कलर प्रिंटर, लॅपटॉप, शासकीय बनावट कागदपत्रे, स्टँपपेपर, शिक्के इत्यादी विकत घेतले. तेथून त्यानी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य राज्यातील बेरोजगार युवकांशी संपर्क साधला. त्यांना सरकारी नोकरीचे अमीष दाखवले. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाकडून 3 ते 5 हजारांची प्रोसेसिंग फी पण घेतली. या दोघांनी चंद्रपुरात ऑफीस सुरु करताना तिथे 9 मुली आणि 9 मुले अशी 11 युवांची टीम तयार केली होती. त्यांना फोनवर कसे बोलायचे याचे ट्रेनिंगही दिले. त्यांनी कॉल सेंटरप्रमाणे कार्यपद्धती राबवत बेरोजगारांना नोकरी लागल्याची सांगण्यात येत. मात्र त्याकरता बेरोजगार तरुणांना अगोदर बँकेतील खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगण्यात येत.

यांच्या या जाळ्यात गड्डीगोदाम येथील गौतम नगरात राहणारा नवीन शशीधरने ही सापडला होता. नवीनने मे महिण्यात या बनावट कॉल सेंटरने वृत्तपत्रात दिलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत शासकीय नोकरीची जाहिरात वाचली होती. जाहीरातपाहून त्यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याने कॉल केला होता. तेव्हा त्याला आधारकार्डसह आवश्यक कागदपत्रे मेल करण्यास सांगण्यात आले. कागदपत्रे पाठविल्यानंतर नवीनला त्याच मोबाईलवरून नोकरीसाठी निवड झाल्याचा कॉल आला. मात्र त्यासाठी त्याला एका बँकेत साडेचार हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तो मोबाईल बंद आढळून आला. त्यामुळे त्याने सायबर क्राईमकडे याबाबत तक्रार केली. या टोळीने महाऱाष्ट्रासह परराज्यातील हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.