येरवडा । सोफासेट खरेदीसाठी 60 हजार रुपये रक्कम भरूनही फर्निचर वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी ईशान्य मॉल येथील फर्निचर विक्र्री करणार्या कंपनीचा मालक व मॅनेजरविरुद्ध येरवडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
विरगो होम डिझायनर नावाचे फर्निचर विक्रीचे दुकान आहे. तुषार चोबे (वय 40, रा. कोरेगाव पार्क) यांनी 25 जून रोजी सोफासेट खरेदी करण्यासाठी मॅनेजर मनिष कुमार यांच्याकडे 10 हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते. 27 जूनला मनिष कुमार यांनी फोन करून उर्वरित रक्कम भरा, असे चोबे यांना कळविले. त्यामुळे त्यांची पत्नी कोमल हिने 28 जून रोजी 50 हजार रुपये भरले. 9 जुलै रोजी सोफासेटच्या डिलीव्हरीसाठी मनिष कुमार यांना फोन केला असता 4 ते 5 दिवसांनी सोफासेट पाठवतो, असे त्यांनी सांगितले. कंपनीचे मालक आनंद व्होरा यांच्याशी संपर्क केल्यावर 8 दिवसांमध्ये सोफासेट मिळेल असे सांगितले. अखेरीस 27 जुलै रोजी त्यांनी एक सोफासेट चोबे यांच्या घरी पाठवला. मात्र त्यांनी जो सोफासेट बुक केला होता. त्याऐवजी दुसरा सोफासेट पाठवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी व्होरा यांच्याशी संपर्क साधला असता पैसे परत मिळणार नाहीत, काय करायचे ते करा, असे म्हणून सोफा बदली करण्यास नकार दिला.
याप्रकरणी फसवणुकीसह दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल कंपनीचे मालक व मॅनेजरविरूध्द गुन्हा दाखल करून येरवडा पोलिसांनी मॅनेजर मनिष कुमार याला अटक केली आहे.