ठाणे – नवीन गाडी कंपनीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलीस या भामट्याच्या मागावर असतानाच तक्रारदाराने फसवणूक झालेल्यांचा व्हाट्सअप ग्रुप काढून सोशल मीडियाच्या साह्याने या भामट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रोहित गायकवाड असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भामट्याचे नाव आहे. रोहितने या आधीही अनेकांना टोपी घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई येथील वाकोला येथे राहणाऱ्या रोहितने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने हरप्रित कपूर सारख्या आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कल्याण येथील चिकनघर परिसरात राहणारा हरप्रित कपूर हा आपली चारचाकी गाडी एखाद्या कंपनीमध्ये वाहतूकीसाठी उपलब्ध करुन देऊन उत्पन्न मिळवण्याच्या विचारात होता. यासाठी त्याने विविध वेबसाईटवर संपर्क साधून माहिती गोळा केली. याच दरम्यान एका वेबसाईटच्या माध्यमातून त्याची ओळख रोहित गायकवाड याच्याशी झाली. रोहितने हरप्रितला बँकेचे कर्ज करून गाडी घेऊन देतो व ही गाडी कंपनी किंवा हॉटेलमध्ये लावून तुला महिन्याचे चांगले उत्पन्न मिळवून देतो, असे आमिष दाखवले. सुरुवातीला हरप्रितने याकडे दुर्लक्ष केले. मात्र रोहितने वारंवार हरप्रितशी संपर्क साधण्याचे काम सुरूच ठेवले. अखेर हरप्रित या आमिशला बळी पडला.
हरप्रितने ऑक्टोबर महिन्यात दोन टप्प्यात रोहितला सुमारे १ लाख ८ हजार रुपये दिले. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही गाडी बाबत काहीच हालचाल न दिसून आल्याने हरप्रितला संशय आला. त्याने याबाबत रोहितशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हरप्रितने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी रोहित गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. पोलीस तपास सुरू असतानाच हरप्रितला रोहितने अजून काही जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समजले. त्याने या सर्व फसवणूक झालेल्यांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून रोहितला शोधण्याचे काम सुरू केले. ज्या वेबसाईटच्या माध्यमातून रोहितशी संपर्क झाला होता त्याच वेबसाईटवर हरप्रितने खोटे खाते तयार केले. रोहितने हरप्रितच्या खोट्या खात्यावर संपर्क साधला. हरप्रितला त्याने डोंबिवलीत बोलावून घेतले. सावज आयते जाळ्यात येणार असल्याने हरप्रितने सापळा रचला. आपल्या सहकार्यांच्या मदतीने रोहितला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.