भोसरी : सोने गुंतवणूक योजनेत सोन्याची मोड करताना सोने घेऊन पैसे परत दिले नाहीत. तसेच सोन्याच्या बिस्किटांच्या नावाखाली सोन्याचे पाणी लावलेला धातू दिला. या प्रकरणी भोसरीतील एका सराफाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरुण पोपट काकडे (वय 55, रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नरेश वडिचार (वय 44) व त्याची पत्नी रजनी वडिचार (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिचार यांचे दिघीरोड, भोसरी येथे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान आहे. जानेवारी 2012 ते जानेवारी 2017 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी काकडे यांना सोने गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी एकूण सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काकडे यांनी गुंतवणूक केलेल्या सोन्याची मोड करताना आरोपींनी सोने घेतले मात्र त्याचे पैसे परत दिले नाही. तसेच त्यांनी दिलेल्या सोन्याच्या बिस्कीटांना केवळ सोन्याच्या पाण्याचा मुलामा देण्यात आल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.