प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
बुवाबाजी हा भारतीय समाजाला लागलेला रोग आहे, यावर शिक्कामोर्तब करायला लावणारी अनेक उदाहरणे गत काही वर्षात समाजात पुन्हा पुन्हा घडत आहे. जनतेने बोगस बाबा-बुवांपासून सावध राहण्याची गरज आहे. धर्माच्या नावावर चमत्कार घडवून देण्याची बतावणी करून हे भामटे गरीब, भोळ्याभाबड्या जनतेच्या अडाणीपणाचा फायदा घेत त्यांची पिळवणूक करतात. वेळप्रसंगी महिलांवर अत्याचार करतात. गुप्तधन मिळवून देतो म्हणत एका भोंदू साधूने चक्क पाच बहिणींवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
या प्रकरणी 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. कथित त्रास असलेली मुलगी आणि तिच्या बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने दार लावून घेतले. त्यानंतर एका मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आई-वडिलांना माझ्या देवी शक्तीने आणि काळ्या जादूने मारुन टाकेन, अशी धमकी दिली. इतर बहिणींवरही बलात्कार केला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. अशीच एक घटना बंगरुळूमध्ये उघडकीस आली. बंगरुळूच्या रामनुतीर्थ नगरमध्ये राहणार्या एका विधवा महिलेस एका भोंदूबाबाने 27 कोटी रुपयांनी गंडविले. आसाराम, साई नारायण, रामराहिम यांनी आपल्या जीवनात काय केले? स्त्रिया व लहान मुलींशी गैरवर्तन केले, अत्याचार केले.
अशा भोंदूंची संख्या व त्यांची नावे व त्यांचे क्रूरकर्म उघड झाले असतानादेखील जनता अशा भोंदू साधूंपासून सावध का होत नाही? धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात अशा भोंदूगिरी करणार्यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. स्वयंघोषित गुरूंची संख्या वाढत असून, त्यांना अनेक लोक बळी पडत आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूंची कुकर्मे उघड झाल्यामुळे अनेक ढोंगी बाबांविरुद्ध केसेस दाखल झाल्या आहेत. आपल्याकडे भक्तीभावाने येणार्यांची फसवणूक करणे हे धर्माला धरून नाही. त्यामुळे धर्माची बदनामी होते व अधःपतन होते तरी देखील धर्माच्या नावावर या लोकांनी दुकाने सुरु केली असून, ते धर्माला बदनाम करत आहेत.
संत परंपरा माहित नसलेल्यांना स्वामी किंवा गुरू म्हणायचे तरी कसे? त्यांची तपस्या, आराधना नाही. कुणीही येतो स्वत:ला जगद्गुरू म्हणवून घेतो. ही जनतेची फसवणूक आहे. स्वत:चे प्रस्थ निर्माण करणार्या, अंधश्रद्धा पसरविणार्यांना राजकारणी प्रोत्साहन देतात. समाजाने याकडे जागरूकतेने पाहिले पाहिजे. भोंदूगिरी करणार्यांकडे शासन यंत्रणा डोळेझाक करते. स्वत: देव असल्याचे भासवून समाजाची दिशाभूल करणार्यांना सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे. अशांची अवैधपणे संपत्ती जप्त करावी, ती सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणावी. भाविकांना परमार्थ, नीतिमूल्ये आणि अध्यात्माचा उपदेश करणार्या या ढोंगीबाबांचे पितळ उघडे झाले पाहिजे. आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तेथे बाया’ या नाटकात अशा ढोंगी, भोंदू बुवांच्या प्रकरणांवर प्रकाशझोत टाकला होता. वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया असे म्हणतात. त्याची प्रचिती वारंवार येऊनही लोक सावध होत नाहीत. ढोंगी बुवांच्या नादी लागतात. त्यांच्याच आरत्या करतात आणि शेवटी पस्तावतात.