बारामती । राज्यसरकारने दहा हजाराची मदत जाहीर करून शेतकर्यांची फसवणूकच केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शासनाने केलेल्या या फसव्या कर्जमाफीबद्दल स्थगन प्रस्ताव मांडून कामकाज रोखणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बारामती येथे दिली.
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पुणे व बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम समारंभात मुंडे बोलत होते. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी असतानाही शासनाने दिड लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. या कर्जमाफीतही अनेक अटी लादल्यामुळे शेतकरी याबाबत समाधानी नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहाचे कामकाज रोखणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकर्यांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही मदत देताना अनेक अटी लादल्याने आजपर्यंत याचा शेतकर्यांना लाभ मिळालेला नाही, असे मुंडे यांनी यावेळी सांगितले.