तळोदा । एखाद्या पोलीस स्टेशनला चोरी दरोडा यातून लुटला गेलेला ऐवज वर्षभरात काही लाखांत असतो. परंतु, पांढरपेशी मंडळी जी ग्राहकांची फसवणूक करतात ती मात्र अनेक कोटीच्या घरात असते. बँका पतसंस्था या व अन्य प्रकारे ही फसवणूक पांढरपेशी मंडळी करते व तेच परत उजळ माथ्याने समाजापुढे वावरतात. अश्या मंडळींचा बंदोबस्त ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून व्हावा ग्राहक पंचायत करीत असलेले काम हे पोलिसांना पूरक असून यात वेळोवेळी लागेल ते सहकार्य करण्यास नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन बांधील राहील असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले.
विविध घटकांची माहिती
वीज वितरण, गॅस वितरण, रेशन पुरवठा, तलाठी, ग्रामसेवक संघटना बांधणी आदींवर संघटक बाळासाहेब औटी व अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी माहिती दिली. नवनियुक्त तालुकाध्यक्ष धडगांवचे फेंदा पावरा, अक्कलकुव्याच्या निशा विसपुते, जीवन माळी, जितेंद्र अहिरे उपस्थित होते. प्रास्ताविक वंदना तोरवणे यांनी तर सूत्रसंचालन विष्णू जोंधळे व आभार उल्हास मगरे यांनी मानले. यशस्वितेसाठी रवींद्र गुरव ,संतोष माळी, सुरेश माळी, महेश पाटील, गोकुळ गुरव, संगीता मगरे, गोपाळ परदेशी यांनी कामकाज पाहिले.
यांची होती उपस्थिती
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नंदुरबार जिल्हा शाखेने आयोजित जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन संजय पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होेते. याप्रसंगी धनंजय गायकवाड, संघटन मंत्री बाळासाहेब औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्ष वंदना तोरवणे, जिल्हा संघटक उल्हास मगरे, उपाध्यक्ष मनोज जव्हेरी, सचिव रवींद्र गुरव, तळोदा तालुकाध्यक्ष अरुण मगरे, विष्णू जोंधळे हे उपस्थित होते.
ग्राहक फसवणूकीत वाढ
दोन सत्रात ग्राहक कार्यकर्ता प्रशिक्षण घेण्यात आले.यात संजय पाटील पुढे म्हणाले की आजची बाजारव्यवस्था बदलत असून ऑनलाईन खरेदीकडे कल वाढत आहे. याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढीस लागत आहेत. ग्राहकांना जागृत करून सर्वच क्षेत्रातील फसवणुकीचे असे प्रकार रोखण्याचे अतिशय स्तुत्य कार्य ग्राहक पंचायत करीत आहे असे सांगितले.