फातिमानगर चौकातही उड्डाणपूल : दिलीप कांबळे

0

पुणे । वानवडीतील फातिमानगर येथील चौकातही उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही तत्वत: मान्यता दिली आहे, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. घोरपडी येथील उड्डाण पुलाचे रखडलेले काम लवकरच सुरू होईल. लुल्ला नगर येथील पुलाचे काम सुरू आहे, अशी माहिती कांबळे यांनी दिली. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कामकाजांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीला दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार, कॅन्टोन्मेंट चे मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कॅन्टोन्मेट मधील 8 प्रभागांचा पाणी प्रश्न, ड्रेनेज प्रश्न बीकट झाला आहे. या दोन्हीसाठीची पाईपलाईन अनेक वर्षे जुनी आहे. त्यामुळे संपुर्ण आराखडा नव्याने करण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे, असे कांबळे यांनी सांगितले. घोरपडी उड्डाणपुलाचे काम दुकानांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर अडले आहे. त्यांचे स्थलांतर कुठे करायचे याचाही आराखडा तयार करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. लुल्लानगर येथील पुलाच्या येथे एक भुयारी मार्ग तयार होईल. त्यासाठी महापालिकेने 1 कोटींची तरतूद केली आहे. उर्वरित खर्च खासदार अनिल शिरोळे, आमदार योगेश टिळेकर व आपण स्वत: विकासनिधीमधून उभा करू, असेही कांबळे यांनी सांगितले.