फैजपूर । येथील दि फैजपूर एज्युकेशन सोसायटी संचलित फातेमा उर्दू गर्ल्स हायस्कुल आणि प्राथमिक खाजगी शाळा या दोन शाळांचा अल्पसंख्यांक पायाभूत सुविधा योजनेतील मिळणार्या अनुदानात सन 2008-09 ते 2014-15 या काळात संस्थाध्यक्ष शेख अमीर अ. अजीज व संस्था सचिव सलिम बेग जमालुद्दीन व मुख्याध्यापक शकिलाबानो शे. असगर यांनी संगनमताने शासनाची फसवणूक, दिशाभूल करीत फातेमा उर्दू हायस्कुल 8 लाख रुपये तर उर्दू प्राथमिक शाळेत 12 लाख रुपयांची अफरातफर, भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माहिती मोहम्मद सादिक शेख हसन यांनी माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे करुन चौकशीची मागणी केली होती.
त्यानुसार या दोन शिक्षणाधिकारी जळगाव यांनी गटशिक्षणाधिकारी (उर्दू बिट) यावल शेख एजाजोद्दीन राकोद्दीन यांना चौकशीचे आदेश केले असता शेख एजाजोद्दीन राकोद्दीन यांनी यावल-रावेर बिटचे विस्तार अधिकारी शेख नईमोद्दीन कुतुबोद्दीन यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आरटीई प्रमाणपत्राची चौकशी करावी
सदर शाळेला 2011-12 मध्ये मंजूर झालेल्या दोन लाख रुपये मिळाले व प्रपत्र 5 प्रमाणे खर्चामधील तपशिलाप्रमाणे ओव्हर हेड प्रोजेक्टर 20 हजार, क्रीडा साहित्य 1 लाख 21 हजार, डाईस 5 हजार 850, वॉल व तार कम्पाऊंड 48 हजार रुपये असा एकूण 2 लाख 2 हजार 850 रुपये नमूद केला आहे. या प्रपत्रावर संस्थाध्यक्ष, सचिव आणि प्रतिस्वाक्षरी म्हणून गटशिक्षणाधिकारी यावल यांच्या स्वाक्षर्या आहे. साहित्य खरेदी करतांना वित्तीय नियमांचे पालन न करता कोटेशन, तुलनात्मक तक्ता उपलब्ध नाही. सदर व्हाऊचरवर मुख्याध्यापकांचे पेड अॅण्ड कॅन्सल असा शेरा व स्वाक्षरी नाही. साहित्य खरेदी नाही, साहित्य खरेदी नोंद मंजुरी शाळा समिती इतिवृत्तात आवश्यक आहे. सदर शाळेस क्रीडांगण नाही, 7-12 उतारा उपलब्ध नाही, खरेदीची नोंद रजि.नं. 32/33 मध्ये घेण्यात आलेेली नाही. तसेच रजिष्टरसुध्दा अद्ययावत नाही. 2 ऑगस्ट 2016 रोजी गटशिक्षणाधिकारी यावल यांनी शाळेला भेट दिल्याचा तक्रारीचा नमूद बाबी मागील वेळा खुलासा मुख्याध्यापकांकडून उपलब्ध नाही, असा चौकशी अहवाल सादर केला असतांनाही तसेच वरिष्ठांचे कारवाई आदेश असतांनाही यावेळी गटशिक्षणाधिकारी यावल शेख एजाजोद्दीन रौनकोद्दीन व विस्तार अधिकारी रावेर – यावल बिट शेख नईमोद्दीन कुतुबोद्दीन शासकिय अनुदानातील अफरातफरीच्या विरोधात पोलिसात का व कशासाठी गुन्हा नोंद केला नाही. यांनी या भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचा हेतु काय आहे, या शाळांना माध्यमिक व प्राथमिक आरटीई प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले आहे, या प्रकाराची तात्काळ वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात यावी. या अफरातफरीतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येण्याची मागणी मोहम्मद सादिक यांनी केली आहे.