मनोभावनेवर आधारित अनिल काकडे यांचे फायनल डिसिजन हे नाटक रंगभूमीवर सादर करण्यात आले आहे, या नाटकाची प्रकाश योजना आणि दिग्दर्शन अनिल काकडे यांनीच केले आहे. जाई वल्लरी 4 यू प्रॉडक्शन या नाट्य संस्थेने याची निर्मिती केली असून, निर्माते अनिल पाकळे हे आहेत, गीत मंदार चोळकर, संगीत शशांक पोवार यांचे असून, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. या नाटकात हर्षद या नाटकात अतकरी, स्वप्ना साने, नयना मुके, ऋषी कुमार, रघु जगताप, नीलेश गांगुर्डे, प्रसाद पंडित या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा यामध्ये मांडली असून, एका चाळीमध्ये राहणारा मध्यमवर्गीय मुलगा नोकरी करून आपल्या आईचा सांभाळ करत असतो. त्याची आई ही खूप आजारी, अंथरूणाला खिळलेली असते, तिचा देवावर विश्वास असतो. आईची सर्व प्रकारची सेवा-शुश्रूषा श्री अत्यंत आनंदाने करत असतो, त्याचे रेणू नावाच्या मुलीवर प्रेम असते आणि ती लग्न करणार असतात, पण आईचा आजार हा बरा होत नाही त्यातच तिला पक्षाघाताचा आघात होतो, आईला आता अंथरूणावरून उठणे शक्यच नसते तिचे सारे श्रीला करावे लागते.
रेणूला कळते की श्री आपल्याशी बोलणे टाळतोय त्यावेळी ती त्याच्या घरी येते आणि बोलते त्यावेळी तिला सारी परिस्थिती समजते ती आईची सेवा करण्यास तयार होते, या परिस्थितीत ते लग्न करतात, रेणू बायको म्हणून घरी येते पण पुढे तिचीसुद्धा चिडचिड होते, ती वैतागते, आईला हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागते. खर्चाचा डोंगर वाढत गेलेला असतो. खोत नावाच्या माणसाने श्रीला पैसे देऊन मदत केलेली असते, त्याचवेळी एक राकेश नावाचा माणूस श्रीच्या घरी येतो आणि एका मोठ्या रकमेची ऑफर देतो त्याने सुचवलेला मार्ग श्री स्वीकारतो. त्यातच आईचा मृत्यू होतो, तिची डेड बॉडी चाळीपर्यंत आणली जाते, पण त्या डेडबॉडीचे पुढे नेमके काय होते? आईच्या मृत्यूनंतर घरचे सारे चित्रच बदलते, चाळीमधील खोली एकदम चकाचक होऊन जाते आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सालींदेकर हे श्रीच्या घरी चौकशीला येतात आणि त्या डेडबॉडीचे नेमकं काय झालं ते उघडकीस येते. हे सारे तुम्हाला नाटकातच पाहायला पाहिजे.
श्रीने आईची सेवा केली आणि त्याने आपल्या आईच्या देहाचे देहदान केलं, पण ते करताना त्याने नेमकं काय केलं त्याचा छडा इन्स्पेक्टर लावतात, पण शेवटी श्री आपल्या बायकोला सांगतो की माझ्या मरणानंतर मात्र माझे देहदान तुला करायचे आहे….एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की मेंदू आणि शरीर हे मृतवत होते, पण आपल्या शरीरातील अवयव, डोळे, किडनी असे अवयव पाच तास कार्यरत असतात, त्याचा उपयोग आपण ते अवयवदान करू शकतो, त्याचा फायदा उपयोग अनेक रुग्णांना होऊ शकतो, या नाटकातून कळत-न-कळत संदेश दिलेला आहे.नाटकात श्रीची भूमिका हर्षद अतकरी यांनी मनापासून केली आहे, आईची भूमिका स्वप्ना साने यांनी ती जगवली आहे, आजारपणाचे बारीक-सारीक पैलू त्यांनी छान व्यक्त केले आहेत. रेणूची भूमिका नयना मुके यांनी समरसतेने केली असून, इन्स्पेक्टर सालींदेकरची भूमिका प्रभावीपणे रंगवली आहे, याशिवाय रघू जगताप, नीलेश गांगुर्डे यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. फायनल डिसिजन हे नाटक आपणाला अंतर्मुख करायला लावते.
अंतिम निर्णय फक्त नियतीच घेऊ शकते
निर्णय घेणे हे काम खूप अवघड आहे, आपल्या आयुष्यात आवश्यकही घटना येतात आणि त्यामुळे आपले जीवन हे त्या गोष्टीमुळे त्रासलेले/वैतागलेले असते. काही प्रसंग हे आपल्या कुटुंबातील कारणामुळे आलेले असतात आणि त्या प्रसंगांना आपल्याला सामोरे जावेच लागते. त्यावेळची मनोभावना ही वेगळी असते. काय करावे सुचत नाही आणि त्यात आपल्याघरी कोणी आजारी माणूस असेल, तर कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही, भावनेच्या भरात काहीही घडू शकते, पण अंतिम निर्णय हा फक्त नियतीच घेऊ शकते.
– दीनानाथ घारपुरे
मनोरंजन प्रतिनिधी
9930112997