नवी दिल्ली : शाळा एक असे ठिकाण आहे की, तेथे तुम्ही शिक्षणाबरोबरच मौजमस्तीही करू शकता. याची माहिती शिक्षकांनाही असते. शाळेत व्यतीत केलेली वेळ माझ्या जीवनातील अत्यंत चांगली वेळ होती, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. यावेळी 2011 च्या वर्ल्डकप स्पर्धेबाबतची एक आठवण ताजी करताना धोनीने सांगितले की, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक जवान मला म्हणाला, सर तुम्ही फायनल हरली तरी एकवेळ चालेल, मात्र पाकविरुद्ध तुम्ही जिंकावेच. माजी सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या शाळेला धोनीने नुकतीच भेट दिली.
सेहवागच्या विद्यार्थ्यांशी संवाद
यावेळी सेहवागसोबत धोनीने विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी एका विद्यार्थ्याने आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण कोणता होता? यास उत्तर देताना धोनीने यावेळी ‘सीआईएसएफ’च्या जवानाची आठवण काढली. धोनी म्हणाला, 2011 च्या वर्ल्डकपच्या अगोदर या जवानाने सांगितले की, सर तुम्ही एकवेळ फायनल हरला तरी चालेल मात्र, पाकिस्तानविरुद्ध तुम्ही जिंकाच. ज्यावेळी आम्ही मोहालीत पाकला नमवून मुंबईत पोहोचलो. तेव्हा लोक म्हणत होते की, पाकला नमवलात आता तुम्ही फायनल जिंकलीच पाहिजे. यामुळेच मनात एकप्रकारची जिंकण्याची तीव्र ईर्ष्या निर्माण झाली आणि आम्ही वर्ल्डकप जिंकलो.
अभ्यासात सरासरी धोनी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अभ्यासात कसा होता? त्याला किती टक्के मार्क्स मिळत होते? या संदर्भात सर्वांनाच माहिती नाही. पण आता स्वत: महेंद्रसिंग धोनी याने विरेंद्र सेहवागच्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात यासंदर्भात खुलासा केला आहे. धोनीने सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असताना सांगितले की, अभ्यासाची मला खुप आवड होती. मला दहावीला ६६ टक्के आणि बारावीला ५६ टक्के मार्क्स मिळाले होते. तसेच मी अकरावी असताना पहिल्यांदा क्लास बंक केला होता.
अभ्यासासोबत खेळही महत्वाचा
धोनीने यावेळी अभ्यासासोबत खेळामध्ये देखील सहभागी होण्याचे आवाहन केले. वर्गात असताना मी लक्षपूर्वक अभ्यास करत असे. ज्यावेळी धोनी १२वीला होता त्यावेळी परीक्षे दरम्यान त्यांनी रांचीच्या बाहेर जावून मॅच खेळायची होती. त्यावेळी धोनीला आपल्या वडीलांकडून परवानगी घ्यायती होती मात्र, कसे विचारावे हे कळत नव्हते. अखेर आईच्या माध्यमातून धोनीने वडीलांकडून परवानगी घेतली. यावेळी धोनीने विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येक खेळामध्ये भाग घेत जा. तसेच तुम्हाला कुठला खेळ आवडतो तसेच त्या खेळात नेमके तुम्ही कुठले काम चांगल्या पद्धतीने करु शकता हे ओळखनेही तेवढेच महत्वाच आहे.