जळगाव । इन्शुरन्सचा चेक देऊन वर्ष उलटून तरी सुध्दा दुचाकी मिळत नसल्याने अखेर भुसावळच्या शेख उमर शेख शब्बीर या तरूणाने फायनान्स कार्यालय गाठत दुचाकी केव्हा मिळेल. याचा जाब विचारल्याचा राग येऊन कर्मचार्याने त्यास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गोलाणीत घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात तरूणाने तक्रार दिली आहे. भुसावळच्या शेख उमर याने लोकसुविधा या फायनान्स कंपनीकडून फायनान्स करत नवीन दुचाकी खरेदी केली होती. मात्र, पाच महिन्यानंतरच दुचाकीला कुणी तरी पेटवून टाकल्याने संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली होती. अखेर शेख उमर याने दुचाकी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यास कंपनीकडून 41 हजार रूपयांचा इन्शूरन्स चेक मिळाला होता. त्याने तो चेक नवीन दुचाकी मिळण्यासाठी जळगावातील लोकसुविधा फायनान्स कार्यालयात जमा केला. परंतू, आठ ते दहा महिने नव्हे तर एक वर्षांपासून वेळोवेळी पाठ पुरावा करून उमर याला दुचाकी मिळत नव्हती. फायनान्स कार्यालयातून उडवा-उडवीचे उत्तर मिळत होती. शेवटी शेख उमर हा मित्रांसोबत शुक्रवारी दुपारी गोलाणी मार्केटमधील लोकसुविधा फायनान्स कार्यालयात आला व मी चेक दिला असून मला दुचाकी अजूनही मिळाली नाही, अशी विचारणा केल्यानंतर कर्मचार्याकडून उडवा-उडवीचे उत्तर मिळत असल्याने अखेर मला दुचाकी कधी मिळेल? अशी विचारणा पुन्हा शेख उमर याने केल्यावर कर्मचार्याने त्याच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर शिवीगाळ करत त्यासह मित्राला मारहाण केली. यात उमरच्या शर्टाच्या बटणे तुटली असून त्यानंतर उमर याने शहर पोलीस स्टेशन गाठत मारहाण कर्मचार्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.