फायबर ऑप्टीकने महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे जोडणार

0

अलिबाग : राज्यातील संपुर्ण ग्रामपंचायती ह्या 2018 पर्यंत डिजीटल (फायबर ऑप्टीक) करण्यात येतील. या फायबर ऑप्टीकच्या माध्यमातून सर्व गावे डिजीटल होऊन जलद विकास आणि सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे शहर व ग्रामिण भेद दूर होऊ शकेल,असा विश्‍वास नवी मुंबई येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत बांधण्यात आलेल्या ग्राम विकास भव संकूलाच्या उद्घाटन वेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस म्हणाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी, अधिकारी , रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगटांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यापुढे बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, ग्रामविकास विभागामध्ये संपूर्ण राज्याच्या विकासाचे चित्र बदलू शकेल एवढी क्षमता आहे. त्यामुळे सामान्यांच्या जीवनात बदल घडू शकेल, ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना या विभागामार्फत राबविल्या जातात. त्या प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे.

ग्राम विकास विभागाच्या चांगल्या कामांचीही प्रशंसा केली.पंडीत दिनदयाळ, उपाध्याय घरकूल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यातील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट निधी देण्याची अंमलबजावणी होत आहे. योजनांच्या यशस्वीतेसाठी ज्या जिल्हयाच्या अधिका-यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांचाही गौरव व अभिनंदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले.ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगांव, ठाणे व सातारा येथील अधिका-यांचा विशेष उल्लेख केला. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण प्रशासकीय व्यवस्थेत विकासाचा कणा असून त्यांनी मनात आणले तर जिल्ह्यात क्रांतीकारी व परिवर्तनीय कार्य घडते असे सांगितले. कागदावरील योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी येत असतांना स्थानिक पातळीवरील अधिकारी अडीअडचणी जे दूर करू शकतात. त्यामुळे योजना यशस्वीतेकडे जाते.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजना भविष्यात मोठी झेप घेऊन राज्याच्या विकासाचे नवे चित्र दाखविल अशी आशा व्यक्त केली. विभागाच्या सर्व योजनांना मुख्यमंत्री महोदयांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महिला बचतगटाबद्दल व महालक्ष्मी सरस प्रदर्शनाबद्दल माहिती दिली.