श्रीनगर । काश्मीरमधील दगडफेकीवरून निर्माण झालेले वादळ शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. केंद्र सरकार येनकेन प्रकारे दगडफेकीच्या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे काश्मिरी नेते मात्र हे प्रकरण कसे चिघळत राहील याकरिता प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान नॅशनल कॉन्फरन्स आणि माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दगडफेक करणार्यांची पाठराखण केली. अब्दुल्ला म्हणाले की, दगडफेक करणारे लोक स्वत:च्या देशासाठी लढत आहे. त्यांचा दहशतवादाशी काहीच संबंध नाही. यावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी भारत आणि पाकिस्तानसंदर्भात अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. अब्दुल्ला म्हणाले की भारत आणि पाकिस्तानला समस्या सोडवता येत नसेल तर अमेरिकेने त्यात पुढाकार घ्यावा. फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी टिका केली. अब्दुल्ला म्हणाले की. मोदींना सांगू इच्छितो की पर्यटन हे काश्मीरमधील जनतेचे जीवन यात शंका नाही. दगडफेक करणार्यांकडे पर्यटनाची हानी करण्याइतपत काही नाही. ते एकवेळ उपाशी राहतील पण देशासाठी दगडफेक करतीलच. हा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे. धर्माच्या आधारावर विभागणी करणार्यांच्या विरोधात ही लढाई आहे. सांप्रदायिक ताकदीला हरवण्यासाठी हा लढा आहे.
ओवेसींचा विरोध
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी फारुख अब्दुल्ला यांना विरोध केला आहे.ओवेसी म्हणाले की, फारुख अब्दुल्लांना निवडणूक लढवायची असल्यामुळे ते अशी वक्तव्ये करीत आहेत. त्यांचे पुत्र मुख्यमंत्री असताना 100 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी फारुख काहीच बोलले नाहीत.
जितेंद्र सिंग यांनी फटकारले
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की निवडणुका जवळ आल्यामुळे फारुख अब्दुल्लांची चिंता वाढली आहे. त्यांच्याकडून अशा वक्तव्यांची अपेक्षा नव्हती. अब्दुल्ला फुटीरवाद्यांची भाषा बोलत आहेत. ते पण अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये होते याचा त्यांना विसर पडला आहे.