फाशीची शिक्षा सुनावलेले चारही दोषी करणार राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

0

नवी दिल्ली । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषींची फाशी कायम राखल्यापासून चारही दोषींनी तुरुंगातील काम थांबवले असल्याची माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यासाठी चारही दोषींचे प्रयत्न सुरू आहेत. ‘फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या विचारात आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्भया बलात्कारप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली. ‘सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यापासून दोषी निराश झाले आहेत. त्यांनी तुरुंगात काम करणेदेखील थांबवले आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्षय ठाकूर, पवन कुमार आणि मुकेश कुमार तिहारमधील क्रमांक-2च्या तुरुंगात असून, विनय शर्मा सात क्रमांकाच्या तुरुंगात आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवली जाण्याआधी अक्षय ठाकूर तुरुंगातील पिठाच्या गिरणीत काम करत होता, तर पवन स्टोर कॅन्टीनमध्ये कार्यरत होता आणि मुकेश हाऊसकीपिंगचे काम करायचा. विजय पदवी परीक्षेचा अभ्यास करत असल्याने तो काम करत नव्हता. ‘आधी ते सोबतच्या कैद्यांसोबत, तुरुंग अधिकार्‍यांसोबत बोलायचे आणि तुरुंगात कामदेखील करायचे. मात्र, आता ते फारसे कोणासोबत बोलत नाहीत आणि कामदेखील करत नाहीत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. तिहारमधील प्रत्येक कैद्याला काम करण्याची संधी दिली जाते. याबद्दल त्यांना दररोज 300 रुपये मेहनताना दिला जातो.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात लवकरच चार दोषींकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी दिली. पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यास दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार आहेत. निर्भया प्रकरणातील दोषींना धोका असल्याने आधी त्यांना स्वतंत्र्य तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येऊ लागले. ठाकूरने तुरुंग प्रशासनाने अनेकदा काम करण्याची परवानगी परवानगी मागितली आहे. मात्र, त्याच्या जीवाला धोका असल्याने त्याला इतरांसोबत काम करण्याची परवानगी देण्यात आली नाही.