फाशीला तात्काळ स्थगिती द्या

0

नवी दिल्ली । भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात करण्यात आली आहे. यासोबतच कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत पाकिस्तानने सुनावलेली शिक्षा ही व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला कौऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यात आला नाही. वारंवार याबद्दलची मागणी करूनही पाकिस्तानने भारताला कौऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला नाही. जाधव प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने निष्पक्षपणे खटला चालवलेला नाही, असे साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सांगितले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीआधी अ‍ॅटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी या प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूने लागेल, असा विश्‍वास व्यक्त केला. पाकिस्तानने नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट आहे. न्यायालयीन आणि मानवाधिकार अशा दोन्ही कायद्यांचे पाकिस्तानने उल्लंघन केले आहे, अशी प्रतिक्रिया रोहतगी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी नेदरलँडमधील हेग येथील ग्रेट हॉल ऑफ जस्टिजमध्ये सुरू आहे. या सुनावणीवेळी भारताची बाजू मांडणार्‍या भारतीय अधिकार्‍यांनी पाकिस्तानकडून वारंवार नाकारण्यात आलेल्या कौऊन्सिलर अ‍ॅक्सेसचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भारताने कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी 16 पेक्षा अधिक वेळा कौऊन्सिलर अ‍ॅक्सेसची मागणी केली होती. यासोबतच कुलभूषण जाधव यांच्याबद्दलची माहिती देण्याची मागणीदेखील भारताकडून करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हा मुद्दादेखील भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी 8 मे रोजी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. यानंतर 9 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. मात्र पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश मानण्यास नकार दिला.