अहमदनगर : अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना कोपर्डी बलात्कार आणि खूनप्रकरणात 18 नोव्हेंबरला दोषी ठरवले होते. अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या बहुप्रतीक्षित खटल्याचा निकाल दिला होता. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. तर 21, 22 नोव्हेंबरला खटल्याची सुनावणी झाली होती. यामध्ये दोषींच्या शिक्षेवर दोन्हीकडील वकिलांनी युक्तिवाद केला होता. याप्रकरणातील नराधमांना बुधवारी (दि.29) न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालय आरोपींना फाशी किंवा जन्मठेप यापैकी नक्की कोणती शिक्षा सुनावणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
फाशीची शिक्षाच योग्य राहील!
कोपर्डीतील नृशंस बलात्कार व हत्याकांडातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील. या खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयात केला होता. दोषींना कमी शिक्षा दिल्यास ते पुन्हा असे कृत्य करणार नाही याची खात्री कशी देणार? असा युक्तिवाद करत निकम यांनी न्यायालयाकडे फाशीची मागणी केली होती. या खटल्यातील दोषींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती दोषींच्या वकिलांनी न्यायालयाकडे 21 नोव्हेंबरच्या सुनावणीत युक्तिवाद करताना केली होती.
बलात्कार, हत्या आणि कटाचे आरोप सिद्ध
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 15 जुलै 2016 रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 16 जुलैरोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता. सरकारी पक्षाकडून मृत मुलीची मैत्रिण, आई, बहीण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपास अधिकारी, पंच अशा एकूण 31 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तर आरोपी संतोष भवाळच्यावतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला होता. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध 24 वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते. या घटनेने राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यात ठीकठिकाणी मराठा मोर्चे निघाले होते. या मोर्चामध्ये कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी होती.