फास्टफूडच्या जमान्यात अवघ्या दहा रुपयांत पोळी-भाजी

0

हडपसर : फास्ट फुडच्या जमान्यात प्रकृती उत्तम ठेवायची असेल तर घरच्या पोळीभाजीला पर्याय नाही, पण आजच्या धावपळीच्या युगात शहरांमधील नोकरदार, विद्यार्थी, कष्टकरी यांना मात्र पोळीभाजीऐवजी फास्टफुडवर अवलंबून राहावे लागते. भूक भागविण्यासाठीच्या या तात्पुरत्या पर्यायामुळे प्रकृतीच्या विविध तक्रारी सुरू होतात. या सार्‍या गोष्टींचा विचार करून हडपसरमधील ‘मेक इट बिग हियर’ या संस्थेने अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ती म्हणजे अवघ्या दहा रुपयांत रूचकर अशी घरगुती पोळीभाजी! नुकताच या उपक्रमाचा प्रारंभ नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते झाला. यावेळी विरेन ओसवाल, रितेश ओसवाल, कल्पेश नवलाखा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक ससाणे म्हणाले ‘अम्मा कॅन्टीन व इंदिरा कॅन्टीनच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मेक इट बिग हियर’ संस्थेने सर्व स्थरांमधील जनतेकरीता अवघ्या दहा रुपयांमध्ये पोळीभाजी, व्हेज पुलाव, मटर रोल किंवा पाणी बॉटल असे चार पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. फास्ट फुडचे फॅड सध्या आपल्या समाजात वाढत चालले आहे, पण पोळीभाजीसारखा उत्तम पर्याय नाही. हे लक्षात संस्थेचा हा उपक्रम नोकरदार, महिला, विद्यार्थी, कामगार, कष्टकरी यांच्याकरीता वरदान ठरलेला आहे.

विरेन ओसवाल म्हणाले, संस्थेने समाजाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे. 100 ठिकाणी या धर्तीवर संपूर्ण पुणे शहरात शाखाविस्तार करण्याचे ध्येय संस्थेने ठेवलेले आहे. या उपक्रमास भरघोस प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत असून खाद्यपदार्थांचा दर्जा हा घरगुती ठेवल्याने ग्राहक समाधानी आहेत. काहीतरी लोकोपयोगी उपक्रम राबवायचा या प्रेरणेने अवघ्या 18 वर्षांच्या वीरेनने गरवारे कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असतानाच या स्वस्त पोळीभाजी केंद्राची सुरुवात केली. तसेच सुखदुःखाचे क्षण इंटरनेटद्वारे जगातील कानाकोपर्‍यात आपल्या नातेवाईक-मित्रांना कळविण्यासाठी ‘एमआयबीएच अ‍ॅप’ही विकसित केले असून हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचे त्याने यावेळी सांगितले.