फिजी देशातील साखर तंत्रज्ञांची विघ्नहर कारखान्यास सदिच्छा भेट

0

जुन्नर । फिजी देशातील फिजी शुगर्स कार्पोशन लि. या संस्थेच्या साखर तंत्रज्ञांनी जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. विघ्नहर कारखाना राबवित असलेल्या उत्कृष्ठ व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाची माहिती या साखर तंत्रज्ञांनी समजावून घेतली. याप्रसंगी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिलदादा शेरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले आणि सर्व अधिकारी वर्गाने विघ्नहर कारखाना वापरीत असलेल्या उत्कृष्ठ प्रकारच्या तंत्रज्ञानाची सविस्तर व मुद्देसुद माहिती या फिजी साखरतंत्रज्ञांना समजावून सांगितली. कारखान्याच्या अधिकारी वर्गाकडून साखर उत्पादन, को-जनरेशन प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प आदींमध्ये वापरात असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती समजावून घेऊन विघ्नहर कारखान्याकडून वापरात असलेल्या तंत्रज्ञानाचा फिजी शुगर कार्पोरेशन वापर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सहवीज निमिर्ती प्रकल्पाची माहिती
विघ्नहर कारखान्याने उभारलेल्या सहवीजनिमिर्ती प्रकल्प अधिकाधिक क्षमतेने सुरू राहण्यासाठी बसविण्यात आलेल्या विविध सिस्टीमची या पाहुण्यांनी सखोल अशी माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे डिस्टीलरी प्रकल्पात अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मिती कशाप्रकारे केली जाते याचा अभ्यास त्यांनी केला. तसेच साखर उत्पादनासाठी कमीत कमी पाण्याच्या वापराचे विघ्नहरचे तंत्रज्ञान या परदेशी पाहुण्यांना विशेष असे भावले. त्यामुळे विघ्नहरचे को-जनरेशन आणि डिस्टीलरी प्रकल्प साखर उद्योगाला निश्‍चितपणे आदर्श व मार्गदर्शक ठरणारे असल्याचे गौरोद्गार यावेळी या परदेशी पाहुण्यांनी काढले. याप्रसंगी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले आणि सर्व अधिकारी वर्ग, फिजी शुगर्स कार्पोरेशनचे मायकेल फॅक्टनफन, अमानी लुम, जोसेफ साबा, जॉन थूगर्ड, इराणी, ख्रीसफॉनन बाऊन, इसाक मायकेल, महीद्र मनोहर, विनेश प्रसाद, कोटकर आदि साखरतंत्रज्ञ उपस्थित होते.

विविध उपक्रमांचे कौतुक
याप्रसंगी विघ्नहर कारखाना, को-जनरेशन प्रकल्प तसेच डिस्टीलरी प्रकल्प आदी उपक्रमांमध्ये वापरीत असलेल्या कमी खर्चाचे आणि उत्कृष्ट पद्धतीने तंत्रज्ञान फिजी देशातील साखर उद्योगाला राबविण्याबद्दल सल्ला देऊन आग्रह धरणार असल्याचे या फिजी साखर तंत्रज्ञांनी सांगितले. त्याचबरोबर विघ्नहर कारखाना राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून कारखान्याच्या गळीत हंगामा करीत शुभेच्छा दिल्या.