‘फिटलं’ का म्हणत नाही?

0

महाराष्ट्रात मागील सहा महिन्यांमध्ये साडेचार हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. आया-बहिणींच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगड्या फुटत असताना, पोराबाळांची आबाळ होत असताना, जनआक्रोश सरकारच्या कानीकपाळी कर्जमाफीचा घंटानाद करत असताना राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला शेतकरी कर्जमाफी का द्यावी वाटत नाही? कर्जमाफीच्या मुद्द्यावर हे सरकार वेळकाढूपणा का करत आहे? आताही 10 हजार रुपयांच्या तुटपुंज्या रकमेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अक्षरशः कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची सोय नाही, त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तेथे दहा-वीस रुपये देऊन तो फॉर्म भरून द्यावा लागतो. शासकीय यंत्रणा गेंड्याची कातडी पांघरलेली आहे. तेही धड सहकार्य करत नाही. एकूणच काय तर दहा हजार रुपयांचे अनुदानही या शेतकर्‍यांना ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशागत झाले आहे. या राज्याला अत्यंत बोलघेवडा मुख्यमंत्री लाभला. मुख्यमंत्री घोषणा करतात खरे; परंतु त्या पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा त्यातून पळवाट काढली जाते. आता शेती कर्जमाफीची घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनाचा वणवा शांत केला खरा; परंतु जेव्हा प्रत्यक्षात कर्जमाफी देण्याची वेळ आली तेव्हा नानाविध अटी व शर्ती घालून ती प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरी पडणार नाही, याची तरतूद करणे सुरु केले आहे. खरे तर पेरणीपूर्वीच शेतीकर्ज माफ व्हायला हवे होते. तसे झाले नाही. तेव्हा उशिरा होणारी कर्जमाफी बळिराजाला काय फायद्याची ठरणार?

यंदा राज्यातील सर्व भागात चांगला पाऊस झालेला नाही. दुष्काळाचे सावटही दाटले आहे. अजूनही चांगला पाऊस झाला नाही तर अवघड परिस्थिती निर्माण झालेली असेल. त्यामुळे तातडीने कर्जमाफी देऊन शेतकरीवर्गाचा गळफास ढिला करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करायला हवे होते. निव्वळ शाब्दिक वल्गना, तांत्रिक कुरबुरी आणि कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीही होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या धोरणाबद्दल काल-परवा जाणते नेते शरद पवार यांनी औरंगाबादेत बोलताना फार मार्मिक बोट ठेवले होते. खरे तर तो भाजपसाठी एक सूचक इशाराच म्हणावा लागेल. फडणवीसांना पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर त्यांनी ‘फिटलं‘ असे म्हणावे, असे पवारांनी सांगितले. हा फिटलं काय प्रकार आहे? तर त्याचेही स्पष्टीकरण पवारांनी दिले होते. क्रांतीसिंह नाना पाटील हे एकवेळ बीड लोकसभा निवडणुकीत उभे होते. प्रचाराच्या काळात नाना पाटील यांनी मी जिंकलो तर तुमचे सर्व कर्ज फिटेल असे समजा, असे आश्वासन दिले होते. या एकाच आश्वासनावरून नाना पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. आताच्या फडणवीस सरकारनेही एकवेळ ‘तुमचं सगळं फिटलं’ असे जाहीर करावे, म्हणजे पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला असे समजा, असेही पवार सांगण्यास विसरले नाहीत. या वाक्यात कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्ता येणार नाही, असा धोक्याचा इशारा होता. आणि, तो इशारा पवारांसारख्या जाणकार नेतृत्वाने फडणवीस यांच्यासारख्या नवख्या नेतृत्वाला दिला होता. तो कितपत गांभिर्याने घ्यायचा याचा विचार आता फडणवीस यांनी करायला हवा.

हे सरकार वारंवार फसव्या घोषणा करत आहे. त्यांनी घोषणा केली होती, की शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. जवळपास 90 टक्के शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. दीड लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आलेले आहे. जे शेतकरी नियमित हप्ता भरतात त्यांना 25 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. यापैकी कोणती घोषणा सरकारने पूर्ण केली हे त्यांनीच सांगावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, असे या कर्जमाफीचे नामकरण करताना सरकारने दहावेळा विचार करायला हवा होता. कारण, ज्या छत्रपतींचे नाव या योजनेला देण्यात आले ती योजनाच मुळात फसवी ठरली. अशा फसव्या योजनेला छत्रपतींचे नाव देण्याचा उद्दामपणा सरकारला शोभणारा नाही. आणि, खरेच कर्जमाफी द्यायचीच असेल तर ती विनाअट सरळ सरळ देऊन टाकावी. नुकतेच केंद्र सरकारने उद्योजकांचे 82 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. उद्योजकांना अशी कर्जमाफी देण्यासाठी केंद्राकडे पैसा आहे, आणि महाराष्ट्रातील शेतकरी मात्र वार्‍यावर सोडले गेलेत. हा भेदभाव केंद्र सरकारला तरी शोभतो का? राज्यानुसार असे धोरण बदलणे हे सरकारचा दुजाभाव दाखवते. असा दुजाभाव जर केंद्राच्या मनात असेल तर त्याचे चांगले परिणाम असणार नाहीत. राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर आहे, याची जाणिव केंद्राने ठेवायला हवी. शेतीकर्जमाफीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहे. हा प्रकार तर प्रचंड उद्विग्नता आणणारा आहे. गावकुसातील शेतकरी त्यामुळे संतप्त झालेला आहेत. हा संताप सरकारविरोधात जनमत निर्माण करत आहे. जनभावना सूचक शब्दांत पवारासारख्या ज्येष्ठ नेत्याने सरकारच्या कानावर अगदी जाहीरपणे घातली. त्यावर अंमलबजावणी करायची की नाही, हे आता सरकारने ठरवावे. शहाणे असेल तर एकवेळ ‘तुमचं फिटलं’ असेच जाहीर कराल!