अमळनेर। येथील फिनिक्स सोशल अवेरनेस गृपचा पाचवा वर्धापन दिन व अॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सालाबादाप्रमाने या वर्षी देखील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे लेखक व साहित्यिक तसेच वृत्तपत्र क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले सामाजिक प्रश्नांवर प्रखर मत मांडणारे जेष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे हे प्रमुखवक्ते म्हणून यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गृपच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिक, युवक, युवती आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स सोशल अवेरनेस गृप व जिजाऊ बहुद्देशिय संस्था यांच्यावतीने करण्यात आलेले होते. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, कृउबा संचालक पराग पाटील तर फिनिक्स ग्रुपच्या सदस्या सदस्या भारती पाटील, रेणू प्रसाद, विद्या हजारे, सुचिता पाटील यावेळी उपस्थित होत्या.
स्त्रीच्या प्राचीन ते वर्तमानावर केले भाष्य
यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांनी स्त्रीच्या प्राचीन ते वर्तमान स्थितीवरील भाष्य करीत महिलांच्या विषमतेवर भाष्य केले. आता ही महिलांना कायम द्यावी लागणारी अग्निपरीक्षा नाकारा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांना आपण का लढतो आहोत आणि लढण्याचे नेमके कारण काय हे नीट सांगता येत नाही त्यामुळे महिलांचे प्रश्न सुटत नाही. महिलांना इतिहास उलगडत नाही आणि त्यांना उलगडू दिला जात नाही. पुरुषांनी तिला आपल्या सोयीसाठी देवी बनविले कारण महिला ही महाबलवान आहे आणि म्हणून महिलेला एका व्यवस्थेने वेगवेगळ्या रूपांमध्ये अडकवून ठेवले जाते. महिला समता निर्माण करीत असतात जे पुरुषांना कधिच जमणार नाही. असे अनेक किस्से त्यांनी यात सांगून सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल माळी आणि सत्रसंचालन वंसुंधरा लांडगे यांनी केले.