फिरकीच्या जादुगाराच्या वाढदिवसाला सेहवागच्या हटके शुभेच्छा

0

नवी दिल्ली । फिरकीचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि आपल्या गोलंदाजीने भल्याभल्यांची दांडी उडवणार्‍या मुथय्या मुरलीधरनचा 17 एप्रिल रोजी 45 वा वाढदिवस. या निमित्ताने त्यालाअनेक दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या विरेंद्र सेहवागने त्याच्या अनोख्या शैलीत मुरलीधरनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन मुरलीधरनला नेहमीप्रमाणे हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवाग-मुरलीची जुगलबंदी
आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या सेहवागने 14 वर्षांच्या कारकिर्दीत मुथय्या मुरलीधरनची सर्वाधिक भीती वाटल्याची कबुली याआधीच दिली आहे. गोलंदाजीची शैली आणि अचूक टप्प्यामुळे मुरलीधरनची गोलंदाजी सर्वाधिक धोकादायक असायची, असे सेहवागने म्हटले होते. 2009 च्या मुंबई कसोटीत मुरलीधरनने सेहवागला 293 धावांवर बाद केले होते. त्यामुळे सेहवागच्या विक्रमी तिसर्‍या त्रिशतकापासून दूर राहिला. त्या कसोटीत सेहवागने मुरलीधरनची यथेच्छ धुलाई केली होती. मात्र मुरलीधरनला सेहवागला त्रिशतकापासून रोखण्यात यश आले होते. 2008 मध्ये गॉल कसोटीत मुरलीधरन आणि अजंता मेंडिसच्या फिरकी जोडीसमोर सेहवागने 201 धावा केल्या होत्या. या कसोटीत भारताने विजय मिळवला होता.

काय दिल्या शुभेच्छा
‘दिग्गज खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या खेळाडूने फक्त फलंदाजांना चकवले नाही, तर हा खेळाडू स्वत:देखील चकित झाल्यासारखा दिसायचा आणि फलंदाज त्याला पाहून विचार करायचे- मौत आया मुरलीधरन’, असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे. मुरलीधरनच्या मुथय्या नावाचा उल्लेख इंग्रजी समालोचक ‘मौत आया’ किंवा ‘मौताया ‘असा करायचे. यासोबतच अनेक दिग्गज फलंदाजांसाठी मुरलीधरनची गोलंदाजी कर्दनकाळ ठरली होती. त्याचा संदर्भ घेत सेहवागने मुरलीधरनला त्याच्या हटके स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.