फिल्मीस्टाईल कार अडवून 27 लाखांची कॅश लांबविली

0

बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील भरदिवसाचा थरार

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील हॉटेल मल्हारसमोरील पेट्रोलपंपावर जमलेली 27 लाख रुपयांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लुटून नेली आहे. या चोरट्यांनी फिल्मीस्टाईल कार अडविली, चालकावर कोयत्याने सपासप वार केले आणि काही कळायच्याआत रोकड घेऊन पोबारा केला. या चोरट्यांनी दोघापैकी एकाची दुकाची घटनास्थळीच टाकून पळ काढल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली खरी, परंतु उशिरापर्यंत हे चोरटे हाती लागू शकले नाहीत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात होता.

दरोडा पूर्वनियोजित असल्याचा संशय
बिबवेवाडी-कोंढवा रोडवर आम्रपाली नावाचा पेट्रोलपंप आहे. तेथे तीन दिवसांपासून जमलेली 27 लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी एका कारमधून नेण्यात येत होती. पेट्रोलपंपाचा मॅनेजर व काही कर्मचारी बँक ऑफ इंडियाच्या भवानीपेठ शाखेत घेऊन जात होते. ते वॅगनआर कार (क्रमांक एमएच12, डीई 7023)ने जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लाईट हाऊससमोर ही कार दुचाकी आडवी लावून रोखली. काही कळायच्याआत चालकावर कोयत्याने सपासप वार केले. तसेच, मॅनेजरकडे असलेली पैशाची बॅग हिसकावून घेतली व एकाच दुचाकीवरून पळ काढला. घटनास्थळी एमएचआर 8412 क्रमांकाची दुचाकी पोलिसांना मिळून आली आहे. दरम्यान, या चोरट्यांनी दुचाकी अगदी दुभाजकाला चिकटून उभी केल्याने चालकाला वाहनाच्याखाली उतरता आले नाही. तसेच, या परिसरात सीसीटीव्हीची संख्याही कमी असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे हा दरोडा पूर्वनियोजित असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करत आहेत.