फि वाढीच्या निषेधार्थ पालकांचे उपोषण

0

बारामती । विद्याप्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर प्रशालेच्या फि वाढीच्या निषेधार्थ पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण सुरू केले आहे. अवघ्या दिडच महिन्यापूर्वी पालकांनी जवळपास 90 टक्के फी वाढविल्याबद्दल तीन दिवस अांदोलन केले होते. त्यावेळी शाळा प्रशासनाने फि कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, या आश्‍वासनाची पुर्ती झाली नाही म्हणून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे अांदोलन एक दिवसाचे असून लवकरच तीव्र लढा उभारला जाईल, असे यावेळी पालकांनी सांगितले.

भरमसाठ फि घेऊनही विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. इथे धनदांडग्यांची मुले येतात म्हणून मोठ्या प्रमाणात फि वाढ केली जात असल्याचे सांगितले जाते. मोलमजुरी करणार्‍यांची मुलेही इथे शिकतात याचा प्रशासनाने विचार करावयास हवा त्यासाठी आम्हाला न्याय हवाय असेही पालकांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदरावजी पवार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्‍वस्त आहेत. पदाधिकार्‍यांना पालकांनी फि वाढीसंदर्भात सविस्तर भुमिका मांडली. मात्र, पालकांच्या हातात आश्‍वासनाखेरीज काहीच आले नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात तैनुर शेख, संजय वाघमारे, तानाजी पाथरकर, अजित साळुंखे, अविनाश लोहार, राजू कांबळे, संतोष लोणकर, गौरव वणवे, प्रमोद गुळुमकर, पोपट धावरे, फैयाज ईलाही, सोमनाथ कवडे, विशाल सरोदे, संतोष आगवणे, दिलीप शिंदे, अजिंक्या सरोदे आदी पालकांनी सहभाग नोंदविला.