नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्यामुळे आशियाई चॅम्पियनशिपसाठी जाहीर भारतीय संघातून वगळण्यात आलेली २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील अव्वल महिला खेळाडू खुशबीर कौरने कुठलीही चूक नसताना शिक्षा भोगत असल्याचे म्हटले आहे. मला माझे प्रशिक्षक अलेक्झांडर अर्तसीबाशेव्ह यांनी स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली होती, असे खुशबीर म्हणाली. रशियात जन्मलेले अलेक्झांडर यांना आशियाई चॅम्पियनशिपनंतर पदावरून हटविण्यात येणार आहे.
अलेक्झांडर यांच्याकडून चुकीची माहिती
अलेक्झांडर यांनी खुशबीर व मनीषसिंग रावत यांची प्रकृती ठीक नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते. याउलट खुशबीर व रावत यांनी आम्ही फिट होतो असे सांगितले; पण एएफआयला सूचित न करता माघार घेण्याची वेगवेगळी कारणे दिली. खुशबीर म्हणाली, ‘एएफआयला सूचना देणे माझे काम नाही. यासाठी प्रशिक्षक आहे. मी कोचच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. त्यामुळे मी प्रशिक्षकाचे ऐकायचे की एएफआयचे, हे मला सांगा. प्रशिक्षकांनी मला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होण्यास सांगितले होते.
कुठलीही अडचण नव्हती
खुशबीर म्हणाली मला ज्वर नव्हता. मी फिट होते. मला आशियाई चॅम्पियनशिपसाठी थेट प्रवेश देण्यात येईल, त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची गरज नाही, असे प्रशिक्षकांनी सांगितले होते.’ रावतने सांगितले की, मला एएफआय किंवा प्रशिक्षक अलेक्झांडर यांच्यापैकी कुणीच आशियाई स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असल्याचे सांगितले नव्हते. जर हे आवश्यक होते तर मी सहभागी व्हायला पाहिजे होते. त्यात कुठलीही अडचण नव्हती. मी पूर्णपणे फिट होतो.’