बारामती । विद्याप्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळा व्यवस्थापनाने केलेल्या फी वाढीच्या निषेधार्थ शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 95 टक्के शाळा बंद ठेवण्यात पालक यशस्वी झाले.
पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी प्रमोद काळे यांनी शाळेकडे शुल्क तपशीलांची माहिती मागितली होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाने माहिती देण्यास नकार तर दिलाच पण गटशिक्षण अधिकार्यांच्या अर्जास केराची टोपली दाखविली आहे. शुल्क नियंत्रण विभागाचे व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील यांनीसुद्धा माजी गटशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांना शाळा व पालकांची बैठक बोलावून शाळेस एवढी फी वाढवता येत नाही, असे सांगितले होते. वणवे यांनी शाळेस लेखी स्वरुपात अशी कल्पना दिली होती. परंतु शाळेने आपलेच म्हणणे बरोबर आहे, असे गृहीत धरून सतत नकारात्मक भूमिका घेतली आहे. याचमुळे पालकांनी बंद पुकारला आहे.