फी वाढ केल्याने भुसावळच्या एन.के.नारखेडेत शाळेत पालक संतप्त

0

वार्षिक सभेत पालकांनी शुल्कवाढीला मान्यता दिल्याची बाब पालकांनी केली अमान्य ; निर्णयाकडे लागले लक्ष

भुसावळ- शहरातील शांतीनगर भागातील एन. के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक संघाच्या बैठकीत वार्षिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यास पालकांनी संमती दिल्यानंतरही काही पालकांना याबाबतचा निर्णय शनिवारी कळाल्यानंतर त्यांनी शाळेत येवून गोंधळ घातला तसेच या प्रकाराबाबत प्राचार्यांना जाब विचारला. संस्थेच्या संचालक व सभासदांनी व्यवस्थापनाकडून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांचा राग शांत होवून या प्रकरणावर पडदा पडला मात्र पुढील निर्णयाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

फी वाढ पालकांना अमान्य
एन. के. नारखेडे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी पालक संघाच्या बैठकीत दोन हजार रुपये शुल्कवाढ करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आली व त्याबाबत पालकांनीही सहमती त्यावेळी दर्शवली होती मात्र शनिवारी काही पालकांनी फी वाढीला विरोध करीत शाळेत गोंधळ घातला. 22 सप्टेंबर रोजी पालक-शिक्षक संघाची बैठक होवून त्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढीची मागणी समोर आल्यानंतर त्यास 35 पैकी 25 पालकांनी शुल्कवाढीला सहमती दर्शवली होती. मात्र इतर पालकांना या शुल्कवाढीची कोणतीही कल्पना नसल्याने त्यांनी शनिवारी गोंधळ घातला. संस्थेचे सभासद विकास पाचपांडे व विजय भंगाळे यांनी पालकांना वार्षिक सभेत पालकांनी या शुल्कवाढीला होकार दिल्याची माहिती दिली असली तरी फी वाढ मान्य नसल्याची आक्रमक भूमिका पालकांनी मांडली.

पालकांची लूट होत असल्याचा आरोप
एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलने दोन वर्षांनी प्रवेश शुल्कवाढ केली जाते मात्र यंदा पालकांनी फी वाढीला तीव्र आक्षेप घेतला आहे. संस्थेकडून पालकांची लूट चालवली जात असल्याचा आरोप प्रसंगी करण्यात आला. दरम्यान, व्यवस्थापन पालकांच्या दबावापुढे झुकून फी वाढीचा निर्णय मागे घेते की फी वाढ करते? याकडे शहरातील सुज्ञ पालकांचे लक्ष लागले आहे.