फुकटचे वृक्षप्रेम दाखविणार्‍या संस्थेला जनता जाब विचारेल!

0

निगडी ते देहूरोड चौपदरीकरणाचे त्रांगडे

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते शिळफाटा या सुमारे 94 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे गेल्या 14 वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले. मात्र, या कामात अंतर्भाव असलेल्या निगडी ते देहूरोड या 6.3 किलोमीटर अंतरातील रस्ता एकपदरीच राहिला. या अरूंद मार्गावर मागील पाच वर्षात शेकडो अपघात झाले. त्यात 350 हून अधिक लोकांचे मृत्यू आणि शेकडो प्रवासी जायबंदी झाले. अशा पार्श्‍वभूमीवर शहरातील नागरिकांनी अनेक आंदोलने करून महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण करण्यास संबंधित यंत्रणेस भाग पाडले. मात्र, फुकटचे वृक्षप्रेम दाखवून काही संस्था हे काम रोखू पाहत आहेत. अशा संस्थांना आता हरित लवादासमोर सर्वसामान्य जनताच जाब विचारेल, असा ठराव सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

बैठकीला यांची उपस्थिती
सर्वपक्षीय कृती समितीतर्फे शहरातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निगडी ते देहूरोड चौपदरीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष लहूमामा शेलार, बाळासाहेब झंजाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य गोपाल तंतरपाळे, नीरज गुंदेशा, रेणू रेड्डी, अंजनी बत्तल, विलास शिंदे, गुरमितसिंग रत्तू, व्यंकटेश कोळी, सुशिला नरवाल, भरत नायडू, संजय पिंजण, संजय धुतडमल, धर्मपाल तंतरपाळे आदी प्रमुख पदाधिकार्‍यंसह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाहक वाद निर्माण करून खोळंबा
अनेक वर्षांच्या लढ्यानंतर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. त्यात बाधित ठरणारी रस्त्यालगतची झाडे तोडणे आवश्यक होते. या झाडांच्या बदल्यात तीनपट झाडे लावणे व त्यांचे पाच वर्षे संगोपन करण्याची अट संबंधित ठेकेदाराला घालण्यात आली आहे. मात्र, असे असूनही ज्यांचा या रस्त्याशी काडीचाही संबंध नाही; अशा एका संघटनेने नाहक वाद निर्माण करून हरित न्यायाधिकरणाकडे या कामाला आव्हान दिले आहे. या कायद्याच्या लढाईत काम अडकले असून, अपघातांचा धोका अधिक वाढला आहे, असा सूर या बैठकीत उमटला.

विविध प्रश्‍नांवर लढा देण्याचा निर्णय
ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्या त्या सर्वांना एकत्र करून संबंधित संस्थेच्या विरोधात हरित न्यायाधिकरणापुढे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देहूरोड परिसरात वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. शहरातील विविध प्रश्‍नांवर लढा देण्यासाठी देहूरोड शहर नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी लहूमाम शेलार यांची निवड करण्यात आली.

हरित लवादाकडे याचिका
महामार्ग चौपदरीकरणात बाधक ठरणारी झाडे हटविण्यास एका संस्थेने आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी ठप्प आहे. या संस्थेच्या हेतूबाबत शंका निर्माण होत असल्यामुळे सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीने हरित लवादापुढे या संस्थेविरुद्ध याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब झंजाड यांनी दिली.