मुंबई । उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसर्याला देणे, विनातिकीट प्रवास करणे, अशा घटनांची संख्याही वाढतच आहे, अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत 10 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने 2 लाख 44 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्याद्वारे पश्चिम रेल्वेने 10 कोटी 96 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे तसेच या महिन्यात 885 भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आले आहे, तर 95 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
तिकीट दलालांवर कारवाई
तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तीं विरुद्धदेखील कारवाई केली. त्यामध्ये 182 जणांना पकडण्यात आले असून, रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले तसेच 12 वर्षांपेक्षा मोठे असणार्या 49 विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आले. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.