भुसावळ । रेल्वेत विना तिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या तिकीट विक्रीत घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 70 जणांचे पथक नियुक्त करुन वरणगाव येथील रेल्वे स्थानकावर धडक तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये विना तिकीटासह नोंदणी न करता साहित्य वाहतुक करणार्या एकूण 470 जणांवर कारवाई केली त्यांच्याकडून 1 लाख 78 हजाार 695 रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांसह रेल्वे स्थानक परिसरात अवैधरित्या खाद्यपदार्थ विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे. रेल्वेच्या अधिकार्यांनी मंडळ रेल्वे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव रेल्वे स्थानकावर पहाटे सहा ते दुपारी 2 वाजेदरम्यान धडक तपासणी मोहिम राबवून विविध गाड्यांमध्ये झाडा झडती घेतली.
यांच्या पथकाने केली कारवाई
यामध्ये वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही.पी. दहाट, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, मंडळ तिकीट निरीक्षक बी.एस. तडवी, मुख्य तिकीट निरीक्षक एच.एस. अहुवालिया यांच्या नेतृत्वात 37 तिकीट तपासणी कर्मचारी, 23 रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि 10 रेल्वे लोहमार्ग पोलीस शाखेचे कर्मचारी यांचे पथक नियुक्त करुन पहाटे 5 वाजता भुसावळहून बसने वरणगावकडे रवाना झाले.
रेल्वे स्थानकावरील नऊ गाड्यांमध्ये प्रवाशांची घेतली झाडा- झडती
यावेळी या पथकाने वरणगाव रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 51183 भुसावळ- नरखेड पॅसेंजर, 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस, 12833 अहमदाबाद- हावडा, 12859 गितांजली एक्सप्रेस, 12656 चैन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, 51198 वर्धा- भुसावळ पॅसेंजर, 17037 सिकंदराबाद- बिकानेर एक्सप्रेस, 12860 गितांजली एक्सप्रेस आणि 12720 हैद्राबाद- अजमेर एक्सप्रेस या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली. यात गाडीतील प्रवाशांकडे तिकीटाची मागणी करण्यात आली असता काही प्रवाशांकडे तिकीट आढळून आले नसल्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे.
असा आकारला दंड
या तपासणीत एकूण 191 विना तिकीट प्रवास करणारे प्रवाशी आढळून आले. यांच्याकडून दंडासहित 71 हजारा 740 रुपये वसुल करण्यात आले सोबत अनियमित प्रवास करणारे 268 प्रवाशांकडून दंडासहित 1 लाख 5 हजार 835 रुपये वसुल करण्यात आले. नोंदणी न करता साहित्य वाहतुक करणार्या 11 प्रवाशांकडून 1 हजार 120 रुपये वसुल करण्यात आले. मंडळाद्वारे करण्यात आलेल्या या तपासणीत एकूण 470 जणांवर कारवाई करुन 1 लाख 78 हजाार 695 रुपये दंड वसुली आकारण्यात आली आहे.