पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या फुगेवाडीचा दाट लोकवस्तीमध्ये समावेश करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यांतर्गत पुणे-मुंबई महामार्ग व अंतर्गत रस्ता रुंदीकरणाच्या कारणामुळे फुगेवाडी गावठाणातील रहिवाशी भाग कमी झाला आहे. या भागाची लोकसंख्या सात ते आठ हजार असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वर्षभरापूर्वी या भागाचा दाट लोकवस्तीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेत मंजर करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी पिंपरी कॅम्पाचादेखील दाट लोकवस्तीमध्ये समावेश करण्याचा प्रस्तावालादेखील महापालिका सभेने मान्यता दिली आहे.
रहिवाशांना दिलासा मिळणार
फुगेवाडीमधील रहिवाशांना बांधकाम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, बांधकाम करताना सवलती मिळणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. यासंदर्भात फुगेवाडी परिसरातील रहिवाशांनी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. अॅड. चाबुकस्वार यांनी याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.