नवी सांगवी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील फुगेवाडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे महापालिकेतर्फे सुशोभिकरण करावे तसेच प्रवेशद्वाराजवळील मुख्य रस्त्यावर भव्य स्वागत कमान उभारावी, अशी मागणी नगरसेविका स्वाती काटे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
आयुक्तांची घेतली भेट
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या फुगेवाडी गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची दुरवस्था झाली असून, या पुतळ्याचे त्वरित सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती मेघडंबरी करावी तसेच ग्रील काम, नवीन टाईल्स बसवून सुशोभिकरण करावे, या मागणीसाठी नगरसेविका स्वाती काटे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
प्रवेशद्वारावर स्वागत कमान हवी
त्याचबरोबर या गावाच्या मुख्य रस्त्यावर स्वागत कमान नसल्यामुळे बाहेरून येणार्या नागरिकांना गावात प्रवेश करण्यासाठी नेमका रस्ता कुठून आहे? असा प्रश्न पडतो आहे. गावाची ओळख व त्या परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी प्रत्येक गावात स्वागत कमान असणे आवश्यक असते. फुगेवाडी या गावाच्या प्रवेशद्वाराजवळ महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या माध्यमातून आकर्षक स्वागत कमान उभारल्यास या परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी स्वागत कमान उभारावी, अशीही मागणी नगरसेविका काटे यांनी केली आहे.