फुगेवाडी परिसरात महिलांचा घागरी, हंडे घेवून रास्ता रोको

0

फुगेवाडी, दापोडी परिसरात वारंवार कमी दाबाने पाणीपुरवठा

सांगवी : दापोडी, फुगेवाडी या परिसरात वारंवार अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून नेहमीच भेडसावणार्‍या पाणी समस्येमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी हंडे, घागरी, बादल्यांसह शनिवारी सकाळी जुन्या मुंबई – पुणे मार्गावर रास्ता रोको केला.दापोडी, फुगेवाडी या परिसरात नेहमीच अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या वारंवार याबाबत तक्रारी होत्या. ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे केली होती.

अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केल्यानंतर केवळ एक दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होत असे. मात्र नंतर परिस्थिती ‘जैसे थी’ असायची. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा ही मागणी वारंवार करूनही संबंधित प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये चीड होती. विशेषत: महिलांवर्गातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नेहमीच भेडसावणार्‍या या समस्येवर प्रशासनाने कायमचा तोडगा काढून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी कांही काळ रास्ता रोको केल्यानंतर पोलिस व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांशी संवाद साधला.

दापोडी, फुगेवाडी या परिसरातील पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून विस्कळीत झालेला आहे. या भागात वारंवार कमी दाबाने,अपुरा तसेच अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. याठिकाणच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा खूपच अपुरा आहे.महापालिकेने आधिक पाणीसाठेची क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधल्यास नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
-स्वाती काटे, नगरसेविका

दापोडी, फुगेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. गढूळ पाणीपुरवठा होतो. ड्रेनेज लाईन खराब झाल्यामुळे ड्रेनजचे पाणी येत आहे. गढूळ पाणी पिल्यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्यातासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. गढूळ पाणी जाईपर्यंत नागरिक पाणी भरत नाहीत. तोपर्यंत तर पाणी जाते. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
-राजू बनसोडे, नगरसेवक

शट डाउन असल्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी देखील ही समस्या राहिल्याने कांही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला होता.नाशिक फाटा या ठिकाणी पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीचा व्हाल्व नादुरस्त झाला असल्याने शनिवारी सकाळी फुगेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बंद होता. मात्र शनिवारी दुपारी या भागातील पाणीपुरठा नियमित केला आहे. शहराचे शेवटचे टोक असलेल्या दापोडी भागात कांही प्रमाणात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे ही वस्तुस्थिती आहे.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
-रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग