शिरगाव । सोमाटणेच्या विठ्ठलवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे यांनी दिली. या निमित्ताने शाळेत फुगे, रांगोळी, फुलांच्या सहाय्याने आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे या मेळाव्याला बाजाराचे आणि उत्साहाचे स्वरूप आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य स्वाती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी लुटला नृत्याचा आनंद
दुपार सत्रात मुलांना गोड शिर्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चेंडू फेकणे, लंगडी, लिंबू चमचा, स्ट्रॉ लावणे, बिया वेगळ्या काढणे असे विविध खेळ घेण्यात आले. त्यानंतर मुलांनी आपल्या आवडत्या गाण्यावर नृत्याचा आनंद लुटला. अशा वेगवेगळ्या व नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पुस्तकी ज्ञानाची सांगड व्यवहारी ज्ञानाशी घालता येते. तसेच मुलांना शाळेची आवड निर्माण होऊन त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव मिळतो, अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे यांनी दिली.
दिड हजार रुपयांची उलाढाल
मुलांच्या हातांवर रंगीबेरंगी टॅटू काढण्यात आले होते. सदर मेळाव्यात खरेदी विक्रीबरोबर मुलांनी विविध चित्र रंगविण्याचा आनंद घेतला. तसेच मुलांनी विविध खाद्यपदार्थांची खरेदी विक्री केली. यावेळी वडापाव, पराठे, भजी, पुलाव, सरबत, फरसाण, इडली सांबर, कुरकुरे, बिस्कीट, चॉकलेट अशा विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीतून जवळपास दिड हजार रुपयांची उलाढाल केली. ही खरेदी विक्री करण्यामागचे एकमेवकरण म्हणजे मुलांना या वयातच शालेय ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञानही मिळते आणि भविष्यात त्यांच्यात दडलेला व्यापारी बाहेर येण्यास मदत होते असे तावरे यांनी सांगितले.
पालकांची हजेरी
शाळेचे शिक्षक आशा काळोखे व शितल कुलकर्णी यांनी सदर बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या चेहर्यावर ओसांडून वाहणारा आनंद व पराकोटीचा उत्साह यामुळे बालआनंद मेळावा यशस्वी झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा गायकवाड, सदस्य उर्मिला उभे, मुमताज शेख, रेश्मा शेख, शुभदा आतकरी, संगीता मुकुटमल पालक व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने याप्रसंगी उपस्थित होते.