फुटपाथवरून न चालणे हा निष्काळजीपणाच

0

मुंबई । फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालताना वाहनाची धडक बसून जखमी झालेल्या व्यक्तीला भरपाईचा दावा करताना तिचा निष्काळजीपणाही महागात पडणार आहे. फूटपाथचा वापर न करणे हा एक प्रकारचा हलगर्जीपणाचा असल्याचा निर्णय देत मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने सहा वर्षांपूर्वी वरळीत घडलेल्या अपघाताच्या प्रकरणात 27 वर्षीय सीए महिलेच्या भरपाई रकमेत 25 टक्क्यांची कपात केली. 2011 साली वरळी परिसरातील रस्त्यावर भरधाव कारची धडक बसून अर्जदार सीए महिलेच्या पायाला दुखापत झाली होती. या महिलेने मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाकडे 25 लाखांच्या भरपाईसाठी दाद मागितली होती. परंतु, न्यायाधिकरणाने केवळ 5.14 लाखांची भरपाई मंजूर केली. अपघातात अर्जदार महिलेचाही निष्काळजीपणा तितकाच कारणीभूत ठरल्याचे न्यायाधिकरणाने निर्णय देताना नमूद केले.

भरपाईची रक्कम कमी केली
याव्यतिरिक्त व्याजाच्या रूपात अतिरिक्त 2 लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायाधिकरणातील उलट तपासणीदरम्यान महिलेने अपघात घडला, त्या रस्त्याशेजारी फूटपाथच नव्हता, असा दावा केला. मात्र, या वेळी न्यायाधिकरणाने पोलिसांनी केलेला पंचनामा विचारात घेतला. रस्त्यावरील अपघाताचे ठिकाण हे फुटपाथपासून तीन फूट अंतरावर होते, असे पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यावरून न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आले. रस्त्याशेजारी फूटपाथ होता,पण अर्जदार महिला चालण्यासाठी स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या फुटपाथवरून चालत नव्हती. फुटपाथऐवजी ती रस्त्यावरून चालली होती. यावरून अपघाताला काही प्रमाणात तिचाही निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे तसेच कार चालकाने अपघात घडला, त्या परिसरातील वर्दळ लक्षात घेऊन काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करणे, हे त्याचे कर्तव्यच होते, असे न्यायाधिकरणाने निकाल देताना नमूद केले.