कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी 15 दिवसातून एकदा फूटपाथ आणि स्कायवॉक धुवून काढण्याचे आदेश देत ही जबाबदारी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि अग्निशमन अधिकार्यावर सोपविली आहे. तर दुसरीकडे अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली असून राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेत आग विझवणे आणि आपत्कालीन काळात मदत करण्याव्यतिरिक्त अग्निशमन गाड्याचा इतर कारणासाठी वापर केला जाऊ नये असे स्पष्ट आदेश 2000 साली राज्य शासनाने सर्व महापालिकांना दिलेले असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून या आदेशाचा भंग केला जात असल्याचा आरोप केला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील फूटपाथ आणि स्कायवॉकवर गर्दुल्ल्याचा वावर वाढल्याने हे फूटपाथ आणि स्कायवॉक अस्वच्छ असल्याच्या नागरिकाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. या तक्रारीची दखल घेत स्टेशन परिसराची जबाबदारी असलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना स्टेशन परिसरातील फूटपाथ आणि स्कायवॉक 15 दिवसातून एकदा अग्निशमन विभागाची मदत घेऊन धुवून काढण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून प्रभाग क्षेत्र अधिकार्यांनी या आदेशाची अमलबजावणी करताना हे स्कायवॉक आणि फूटपाथ पाण्याने स्वच्छ करण्याची जबाबदारी अग्निशमन विभागावर सोपविली आहे.
प्रशासनाचे आदेश
या प्रकरणी अग्निशमन विभागाचे अधिकारी दिलीप गुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी 15 दिवसातून एकदा हे स्कायवॉक आणि फूटपाथ अग्निशमन विभागाकडून धुवून घेण्याचे आपल्याला आयुक्तांचे आदेश असून या आदेशाची अंमलबजावणी करायची असल्याचे सांगितले. मात्र कर्मचार्यांनी आपली याबाबतची नाराजी आपल्याकडे व्यक्त केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.