कोल्हापूर । ‘महाराष्ट्र मिशन 1 मिलियन’ उपक्रमासाठी एक लाख फुटबॉल घेऊन येणारा कंटनेर वाटेतच बंद पडल्यानं फुटबॉलचं वाटप करताना क्रीडा खात्याची मोठीच दमछाक झाली. काही ठिकाणी शुक्रवारी ऐनवेळी फुटबॉल पोहोचले; तर, ग्रामीण भागातील काही शाळांना फुटबॉल मिळालेच नाहीत. त्यामुळं अनेक शाळांना स्वखर्चानं फुटबॉल घेऊन खेळाचा आनंद लुटावा लागला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं राज्यातील 30 हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणं एक लाख फुटबॉल वाटण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी शाळांना ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगण्यात आली होती.
क्रीडा कार्यालयाची धांदल
पुण्यातील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडं याची जबाबदारी होती. त्यासाठी दिल्लीतील गुरुग्राम येथील कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, फुटबॉलची डिलिव्हरी करणारा कंटेनर महाराष्ट्रात येत असताना जंगलात बंद पडला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या ठिकाणी फुटबॉल पोहोचले नाहीत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ होणार होता. मात्र, फुटबॉल मिळाले नसल्यानं जिल्हा क्रीडा कार्यालयाची धांदल उडाली होती.