पुणे। पुणे विभागाच्या प्रवरा पब्लिक स्कूल संघाने मुंबई विभागाच्या कॅथेट्रल हायस्कूल संघाला 4-1 असे पराभूत करताना राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही लढत झाली. प्रारंभी 0-1 असे पित्राडीवर असलेल्या प्रवरा संघाच्या खेळाडूंनी नियोजनबद्ध खेळ करताना सामन्यात वर्चस्व गाजवले. प्रवरा पब्लिक स्कूलच्या ज्ञानेश्वरी मडकेने दोन (27 वे व 38 वे मिनिट) गोल करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पूजा काळे (40 वे मिनिट) व श्रुती मेखे (42 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत ज्ञानेश्वरीला सुरेख साथ दिली. मुंबई विभागाच्या कॅथेट्रल हायस्कूल संघाकडून देवांगी माहेश्वरीने (13 वे मिनिट)संघासाठी एकमेव गोल केला. पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
उपांत्य लढतीमध्ये पुणे विभागाच्या प्रवरा पब्लिक स्कूलने अमरावती विभागाच्या प्रबोधन विद्यालयावर 1-0 असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अखेर सडनडेथमध्ये शिवांजली खोडदेने गोल करताना प्रवरा पब्लिक स्कूल संघाला अंतिम फेरी गाठून दिली.दुसर्या उपांत्य फेरीत मुंबई विभागाच्या कॅथेट्रल हायस्कूलने कोल्हापूर विभागाच्या कर्ड सिद्धेश्वर विद्यालयाचा 2-1 ने पराभव केला. विजयी संघाकडून देवांगी माहेश्वरी (15 वे मिनिट), सैया मेहता (23 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 1 गोल केला. कोल्हापूरच्या कर्ड सिद्धेश्वर विद्यालयातर्फे ज्योती मोरबळे (36 वे मिनिट) हिलाच गोल करता आला. मध्यंतराला कॅथेट्रल हायस्कूल संघ 1-0 आघाडीवर होता. तिसर्या स्थानासाठी झालेल्या लढतीत अमरावती विभागाच्या प्रबोधन विद्यालय संघाने कोल्हापूरच्या कर्ड सिद्धेश्वर हायस्कूल संघाला 1-0 असे पराभूत केले. सामन्यातील एकमेव गोल साक्षी हिवाडेने 24 व्या मिनिटाला केला.