नवी दिल्ली । भारतात होणार्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. स्पर्धेतील भारताचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानाऐवजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत.
भारतीय फुटबॉल महासंघाने हा बदल केला असला तरी, अजून त्याची माहिती फिफा’ आणि स्थानिक संयोजन समितीला देण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रीडा मंत्रालयाने भारताचे सामने नवी दिल्लीत खेळविण्याची मागणी केल्यामुळे आम्हाला हा बदल करावा लागल्याचे फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले. स्पर्धेतील सामने अन्यत्र हलविण्यात आल्याची आम्हाला कल्पना नसल्याचे फिफा’ने स्पष्ट केले आहे. फिफा’ मुंबईत 7 जुलै रोजी स्पर्धेच्या अधिकृत कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुंबईत अ गटातील तीन साखळी लढती होणार होत्या.