नवी दिल्ली । आम्ही फक्त मोहरे आहोत. काश्मीर खोर्यात शांतता प्रस्थापित होऊ नये म्हणून पाकिस्तानकडून पैसे घेणारे वझीर दुसरेच आहेत अशी स्पष्ट कबुली हुरियतच्या तिघा नेत्यांनी राष्ट्रीय तपास संस्था करत असलेल्या चौकशीदरम्यान दिली.
काश्मीरमध्ये दंगली घडवण्यासाठी सीमेपलीकडून पैसे येत असल्याचे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने हुरियतच्या फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, जावेद अहमद बाबा उर्फ गाजी आणि नईम खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. राष्ट्रीय स्तरावरील एका वृत्तवाहिनीने ऑपरेशन हुरियत या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून काश्मीर खोर्यात हिंसाचार, अशांतता पसरवण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांनी पाकिस्तानकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचे उघड केले होते. पाकिस्तानकडून हवाला, सीमेपलिकडून चालणार्या व्यापाराच्या माध्यमातून पैसे मिळत असल्याचे कबुल केले होते. या स्टिंग ऑपरेशनची दखल घेऊन राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सोमवारपासून चौकशी सुरू केली होती. ही चौकशी बुधवारीही सुरू राहणार आहे. या चौकशीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी संघटनांना पाकिस्ताकडून मिळणार्या आर्थिक मदतीच्या प्रकरणातील सुमारे 150 प्राथमिक चौकशीचे अहवाल, 13 आरोप पत्रांचाही या चौकशीत समावेश केला आहे. पहिल्या फळीतील तिघा नेत्यांनी दिलेल्या कबुलीमुळे हुरियतचे प्रमुख सैय्यद अली शाह गिलानींचीही चौकशी होण्याची शक्यता असून ही चौकशी दिल्लीतच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.