नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी छापे मारून त्या नेत्यांच्या घरून पाकिस्तानी चलनासह परदेशी चलन जप्त केले आहे. जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी मिळणार्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या तपास यंत्रणेने पुन्हा ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली.
माहितीनुसार, या छाप्यांमध्ये काही हजार पाकिस्तानी रुपये तसेच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचे चलन तसेच काही कागदपत्रे आढळली. तपास अधिकार्यांनी ही सर्व कागदपत्र जप्त केली आहेत. यात सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील तेहरीक-ए-हुर्रियतचा प्रवक्ता अयाझ अकबर यांच्या घरी छापे घालण्यात आले, असल्याची माहिती मिळाली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरून होणा-या व्यापारातील घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका व्यापार्याच्या जम्मूतील घरावर तसेच गोदामावरही यावेळी छापे घालण्यात आले. काश्मिरातील उरी आणि जम्मूतील चकन-दा-बाद येथील सीमेवरून होणारा व्यापार वस्तू विनिमयावर आधारित असल्याने काही व्यापारी याबाबतची बिले कमी वा अधिक रकमेची दाखवून त्यातील तफावतीची रक्कम ही काश्मीर खोर्यात विघातक कारवायांसाठी पुरवत आहेत, असा एनआयएचा आरोप आहे.