फुपनगरी फाट्याजवळ स्कूलबसची अ‍ॅपेरिक्षाला धडक

0

जळगाव : विद्यार्थ्यांना सोडून शाळेकडे परणार्‍या बसने फुपनगर फाट्याजवळ समोरून येणार्‍या अ‍ॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात अ‍ॅपेरिक्षा उलटल्याने त्यामध्ये बसलेले सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दूपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने बसचे काच फोडल्याचेही समजते. तालुका पोलीसांनी बस ताब्यात घेतली आहे.

कानळदा रस्त्यावरील राजाराम नगर येथील समर्थ प्राथमिक विद्यालयातील स्कूलबस क्रं. एमएच.19.व्ही.3838 ही दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी फुपनगरी येथे गेली होती. विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर बस शाळेकडे येत असतांना बसने फुपनगरी फाट्याजवळ जळगावकडून येणार्‍या अ‍ॅपेरिक्षा क्रं. एमएच.19.1973 समोरून जोरदार धडक दिली. बसची धडक लागल्याने उलटली. अ‍ॅपेरिक्षात बसलेले काही नागरिक व चालक हे गंभीर जखमी झाले. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी रिक्षात लोकांना बाहेर काढले. या दरम्यान, संतप्त झालेल्या परिसरातील लोकांनी बसच्या काचा फोडल्या. यानंतर अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीसांनी घटनास्थळ गाठत स्कूलबस ताब्यात घेतली तर जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.

असे आहेत जखमी
स्कूलबसने अ‍ॅपेरिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षात असलेले शिवाजी चव्हाण (वय-35), पंढरीनाथ सिताराम वाणी (वय-52), अरूण मानसिंग धनगर (वय-45), सय्यद पटोकर (वय-32), पांडूरंग रामचंद्र राणे (वय-55), गोरख रामचंद्र सैदाणे (वय-43), रिना भिकारी सोनवणे (वय-35) सर्व रा. कानळदा हे अपघात गंभीर जखमी झाले आहेत. यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून अरूण धनगर आणि सय्यद पटोकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने त्यांची प्रकृति चिंताजनक आहे.