नागपूर। खिळे ठोकताना सवयीनुसार तोंडात खिळे पकडून ठेवलेल्या एका मजुराने नकळत एक खिळा गिळला. हा खिळा फुफ्फुसाच्या खालच्या भागात अरुंद जागी रुतून बसला. या ठिकाणी ब्रॉन्कोस्कोपीही पोहचत नव्हती. शस्त्रक्रिया करून फुफ्फुसाचा तेवढा भाग कापून फेकणे हा एकच पर्याय शिल्लक होता, परंतु रुग्णाच्या जिवाला धोका होता. मात्र डॉ. अशोक अरबट यांनी अनुभव व कौशल्याच्या बळावर फ्लयूरोस्कोपी व ब्रोन्कोस्कोपीच्या मदतीने विना शस्त्रक्रिया हा खिळा अलगद बाहेर काढून मंडप कामगार गजानन नावाच्या रुग्णाचे प्राण वाचविले.
ब्रॉन्कोस्कोपीचा पर्याय
इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट म्हणाले, हा खिळा बाहेर काढण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीची मदत घेणे किंवा फुफ्फुसाचा तेवढा तुकडा कापणे हे दोनच पर्याय होते. उशीर केल्यास टोकदार खिळ्याचे इन्फेक्शन पसरण्याचे व जखम होऊन गुंतागुंत वाढण्याची शक्यता होती. यामुळे तत्काळ निर्णय घेणे आवश्यक होते. शस्त्रक्रिया खर्चिक व धोकादायक होती म्हणून डॉ. अशोक अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपीच्या मदतीने खिळा बाहेर काढण्याचा पर्याय निवडला.
फ्लयूरोस्कोपीची मदत
शस्त्रक्रिया गृहात गजानन यांच्या नाकावाटे श्वसनलिकेमधून ब्रॉन्कोस्कोपी टाकण्यात आली. खिळा अरुंद जागी रुतून बसला होता. त्या ठिकाणी ब्रॉन्कोस्कोपी पोहचत नव्हती. खिळाही दिसत नव्हता. यामुळे फ्लयूरोस्कोपीची मदत घेतली. खिळा नेमका कुठे आहे याचे चित्र स्क्रिनवर दिसत होते. दुसर्या यंत्राच्या मदतीने खिळ्याजवळ पोहचता आले. परंतु खिळ्याला वरची कॅप नव्हती, यामुळे चिमट्यात तो बसत नव्हता. पकडल्यानंतर सुटल्यास त्याच्या टोकामुळे श्वसननलिका फाटण्याची भीती होती. त्या परिस्थितीतही कौशल्याच्या बळावर डॉ. अरबट यांनी अलगद खिळा बाहेर काढला. दोन दिवसांत तो मजूर रुग्ण आपल्या घरीही जाऊ शकला.