फुरसुंगी । लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचार्यांची संख्या नसल्याने फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना वेळेवर आरोग्यसुविधा मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.
उरुळी देवाची-फुरसुंगी परिसरातील कचराडेपोमुळे येथील रहिवाश्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे फुरसुंगी गांव, भेकराईनगर परिसर, शेवाळवाडी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडीपर्यंतच्या सुमारे 2 लाख लोकसंख्येचा कार्यभार आहे. मात्र याठिकाणी अत्यल्प वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची संख्या आहे. वास्तविक पाहता 5 हजार लोकसंख्येमागे 2 कर्मचार्यांची आवश्यकता असताना याठिकाणी अत्यल्प कर्मचारी संख्या आढळून येत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविताना येथील कर्मचार्यांची दमछाक होत आहे, त्याचा विपरित परिणाम येथील गोरगरीब रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळण्यावर होत आहे.
जिल्हा प्रशासनाने येथील कर्मचार्यांची संख्या वाढवावी तसेच येवलेवाडी, वडकी, उरुळी देवाची याठिकाणी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावेत, अशी मागणी येथील रहिवाश्यांकडून होत आहे.